Pune ACB Trap Case | अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडून रेशन कार्डसाठी लाच घेताना अन्न धान्य वितरण कार्यालयातील परिमंडळ अधिकार्याला एसीबीने रंगेहाथ पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडून रेशन कार्डसाठी १६ हजारांची लाच घेताना अन्न धान्य वितरण कार्यालयातील परिमंडळ अधिकार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
गजानन अशोकराव देशमुख Gajanan Ashokrao Deshmukh (वय ३६, रा. निर्माण हिलसाईट, तळजाई पठार, धनकवडी) असे या अधिकार्याचे नाव आहे. गजानन देशमुख हा अन्नधान्य वितरण कार्यालयातील भोसरी येथील फ झोनमध्ये परिमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
तक्रारदार हे अपंग असून समाज कार्य करतात. त्यांना शसकीय कागदपत्रांची माहिती असल्याने ते त्यांचे मित्र व ओळखीचे लोकांसाठी नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी मदत करत असतात. तक्रारदाराचे मित्र व ओळखीचे असे एकूण १४ जणांनी तक्रारदार यांना त्यांची नवीन रेशन कार्ड काढण्यासाठीचे अधिकार पत्र देऊन सोबत सरकारी फी प्रत्येकी ५० रुपये असे दिल्यानंतर तक्रारदाराने १४ जणांचे प्रस्ताव तयार करुन सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून ५० रुपये शासकीय फी ऑनलाईन भरल्यानंतर त्या १४ जणांना १४ रेशन कार्डचे एन नंबर प्राप्त झाले.
त्यानंतर तक्रारदार हे १४ नवीन रेशन कार्ड मिळण्याकरीता भोसरी येथील अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक देशमुख यांना भेटले. त्यांनी प्रत्येक नवीन रेशन कार्डसाठी ९०० रुपये प्रमाणे १४ रेशन कार्डचे १२ हजार ६०० रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची ११ डिसेंबर रोजी पडताळणी केली. देशमुख याने १४ रेशन कार्ड मंजूर करुन त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीस १४ पैकी १० रेशन कार्ड करता प्रत्येकी दीड हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये व उर्वरित ४ रेशन कार्डसाठी प्रत्येकी १ हजार रुपये असे ४ हजार असे एकूण १९ हजार रुपयांची लाच मागितली. त्यात तडजोड करुन १६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर भोसरी येथील अन्न धान्य वितरण कार्यालयात पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून गजानन देशमुख याला १६ हजार रुपयांची लाच घेताना घेताना गुरुवारी दुपारी पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस आयुक्त अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करीत आहेत.
