Pune ACB Trap Case | शेतीचा पंचनामा करण्यासाठी लाच मागणार्या महिला ग्राम महसूल अधिकार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | दोन भावामधील वाटणीवरुन शेतीचा पंचनामा करण्यासाठी व इथून पुढे सहकार्य करण्यासाठी १० हजारांची लाच मागून ७ हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ग्राम महसूल अधिकार्याला सापळा रचून रंगेहाथ पकडले.
प्रमिला नागेशा वानखेडे Pramila Nagesha Wankhede (वय ४२, रा. तक्षशिला सोसायटी, पठारे ठुबेनगर, खराडी) असे या ग्राम महसूल अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदार यांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन असून ते त्यांचे वडिलांनी तोंडी वाटप करुन आलेल्या त्यांच्या शेतीची लेवल करत होते. त्यांच्या भावाने लेवल थांबवून वाटणीप्रमाणे रेकॉर्ड झाल्यावर तू लेवल कर व तुझा ऊसही नंतर तोडणी कर, असे सांगितले होते. त्यावरुन त्यांनी काम थांबविले होते. ९ जानेवारी रोजी शिरसगाव काटा गावाचे महिला तलाठी या तक्रारदार यांच्या शेतातील राहते घरी येऊन तुमच्या शेताचा पंचनामा करायचा आहे, तुम्ही माती विकत असल्याबाबत तक्रार आली आहे, तुम्ही तलाठी कार्यालयात येऊन भेटा, असे सांगितले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी तक्रारदार ग्राम महसूल अधिकारी प्रमिला वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी तक्रारदार यांना तुम्ही मला १० हजार रुपये द्या. तुमच्या बाजूने पंचनामा करते, असे म्हणून त्यांच्याकडे लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १६ जानेवारी रोजी शिरसगाव काटा तलाठी कार्यालयात पडताळणी केली. तेव्हा प्रतिभा वानखेडे यांनी तक्रारदाराचे बाजूने शेतीचा पंचनामा करण्याकरीता व इथून पुढे सहकार्य करण्याकरीता तडजोडी अंती ७ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १६ जानेवारी रोजी शिरुरमधील नाव्हरा – तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौक येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ७ हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रतिभा वानखेडे यांना पकडले. त्यांना ताब्यात घेऊन शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकार्यांनी कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे तपास करीत आहेत.
