Pune ACB Trap Case | रात्री मागितली लाच, सकाळी झाली उपरती ! वॉरंट रद्द करण्यासाठी लाचेची मागणी करणार्या हवालदारासह खासगी व्यक्तीला अटक
पुणे : Pune ACB Trap Case | सावकारीच्या कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून कोर्टात हजर न राहिल्याने जामीनपात्र वॉरंट निघाले होते. हे वॉरंट बजावण्यासाठी साक्षीदाराच्या घरी गेले. वॉरंट दाखवून ते रद्द करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली. दुसर्या दिवशी सकाळी त्यांना उपरती झाली. तेव्हा त्यांनी पैसे नको, कागदपत्रे द्या, असे सांगितले. पण, तोपर्यंत लाचेच्या मागणीची पडताळणी झाली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या हवालदार व खासगी व्यक्तीवर लाच मागणीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे Dashrath Shivaji Bansode (वय ५७, रा. साळुंखे बिल्डिंग, मोरगाव रोड, जेजुरी, ता. पुरंदर) आणि खासगी व्यक्ती सचिन अरविंद चव्हाण Sachin Arvind Chavan (रा. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या मुलाने २०१९ मध्ये एकाविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात सावकारकीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांची पत्नी असे दोन साक्षीदार होते. या खटल्यात ते साक्ष देण्यासाठी वारंवार कोर्टात हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले होते. ते बजावण्याचे काम पोलीस हवालदार दशरथ बनसोडे यांच्याकडे देण्यात आले होते. बनसोडे हा सचिन चव्हाण याला घेऊन ५ डिसेंबर रोजी तक्रारदार यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी हे वॉरंट रद्द करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार १० डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
त्यात हवालदार बनसोडे याने तक्रारदार व त्यांची पत्नीविरुद्ध निघालेले जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच बनसोडे याच्या बरोबरचा सचिन चव्हाण हा पोलीस नसून खासगी व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. १० डिसेंबर रोजी रात्री ही पडताळणी झाल्यानंतर दुसर्या दिवशी बनसोडे यांना उपरती झाली़. त्यांनी तक्रारदार यांना तुमचे पैसे नको, कागदपत्रे द्या, मी वॉरंट रद्द करतो, असे सांगितले. प्रत्यक्ष लाच घेतली गेली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदार दशरथ बनसोडे व तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सचिन चव्हाण यांना ताब्यात घेऊन बुधवारी त्यांच्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे व सहकारी यांनी ही कारवाई केली़ पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.
