Pune ACB Trap Case | खड्डा खोदल्याने वनरक्षकाने मागितली 2 लाखांची लाच ! शेतकर्‍याकडून एक लाखांची लाच घेताना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

acb logo

पुणे : Pune ACB Trap Case | पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदल्याप्रकरणी वनरक्षकाने २ लाख रुपयांची लाच मागितली, त्यातील १ लाख रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनरक्षकाला पकडले. गोविंद रामेश्वर निर्डे Govind Rameshwar Nirde (वय ३२, वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड वन विभाग) असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या तरुण शेतकर्‍याने तक्रार दिली आहे. (Pune Bribe Case)

सासवड वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात गोविंद निर्डे वनरक्षक आहे. तक्रारदार तरुणाने पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदला होता. वनविभागातील अधिकार्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तक्रारदाराने खड्डा बुजविला. त्यानंतर वनरक्षक निर्डे याने याप्रकरणात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच निर्डे याने तक्रारदाराला मागितले.

तक्रारदाराने ३ एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुपचत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची तातडीने पडताळणी केली. त्यात निर्डे याने तडजोडीत १ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. निर्डे याने तक्रारदाराला एक लाख रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी बोलाविले. त्यानंतर सासवड येथील वीरफाटा येथील श्रीनाथ रसवंती गृह येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार तरुणाकडून एक लाख रुपयांची लाच घेताना निर्डे याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे अधिक तपास करीत आहेत.

You may have missed