Pune ACB Trap Case | पुणे : पीक कर्ज मंजूर करुन दिल्याचा मोबदला म्हणून लाच घेणार्या जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | जुने पीक कर्ज भरुन नवीन पीक कर्ज पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून मंजूर करुन घेतल्याबद्दल मोबदला म्हणून लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला पकडले.
नाना चंद्रकांत बोराटे Nana Chandrakant Borate (वय ४३, रा. गोकळी, इंदापूर) असे अटक केलेल्या सचिवाचे नाव आहे.
नाना चंद्रकांत बोराटे हा शासनाच्या सहकार विभागातील कर्मचारी असून सध्या तो जयभवानी विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पंधरवडी येथे सचिव म्हणून नोकरीला आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर पुणे जिल्हा सहकारी बँकेचे असलले जुने पीक कर्ज २४ मार्च २०२६ रोजी भरले. नवीन कर्ज मिळण्याकरीता जय भवानी विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पंधरवडी यांच्या मार्फत पुणे जिल्हा बँकेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याअनुषंगाने तक्रारदार हे ७ एप्रिल रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वडापुरी शाखेत नाना बोराटे यांना भेटले. त्यांनी तक्रारदार यांचे २ लाख ७६ हजार रुपयांचे नवीन पीक कर्ज मंजूर केले आहे. त्याचा मोबदला म्हणून २ हजार रुपये द्यावे लागतील, असे बोलून २ हजार रुपयांची लाच मागितली.
त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची पडताळणी ८ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यात नाना बोराटे याने पीक कर्ज मंजूर करुन दिल्याच्या बदल्यात मोबदला म्हणून १ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जय भवानी विकास सेवा सहकारी सोसायटी, पंधरवडीच्या आवारात ९ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १ हजार रुपये स्वीकारताना नाना बोराटे याला रंगेहाथ पकडण्यात आले. इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांचे सहकारी यांनी केली़ पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.
