Pune ACB Trap Case | पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडून पावणेतीन लाखांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकार्यासह तिघांना अटक
पुणे : Pune ACB Trap Case | पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडे ३ लाखांची लाच मागून पावणेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकार्यांसह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (Pune Bribe Case)
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे Rajesh Shriram Khandare (वय ५२, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, उंड्री मुळ रा. शेगाव, जि. बुलढाणा), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे Anil Popat Randhawe (वय ३२, रा. रॉयल रहाडगी ग्रीन फेज १, शिवराजनगर, काळेवाडी), कनिष्ठ सहायक आतिश कैरू शिंदे Aatish Kairu Shinde (वय ४०, रा. भैरवनाथ कॉम्प्लेक्स, मोहमंदवाडी, मुळ रा. वाडेबोल्हाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या बाबत एका शिक्षण सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. उपशिक्षकपदी पदोन्नतीसाठी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांच्यामार्फत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची त्यांनी भेट घेतली. जातवैधता प्रमाणपत्र नसले तरी अनुकुल प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवितो, असे सांगून खंदारे यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर खंदारे, रंधवे, शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून शिक्षण सेवकाकडून २५ हजार घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्ल्यिानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. उर्वरित पावणेतीन लाख रुपये घेऊन तक्रारदाराला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका मॉलसमोर बोलाविण्यात आले. सोमवारी ६ एप्रिल रोजी सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणार्या रंधवे आणि शिंदे यांना पकडण्यात आले. त्यानंतर खंदारे, रंधवे आणि शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व त्यांच्या सहकारी यांनी ही कारवाई केली. सहायक आयुक्त नीता मिसाळ तपास करत आहेत.
