Pune Accident News | उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून दोघा महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यु; पौड फाटा उड्डाणपुलावरील पहाटेची घटना

Accident

पुणे : Pune Accident News | भरधाव जाणारी दुचाकी पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्याने त्यात दोघा महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यु झाला.

दुचाकीस्वार सर्वेश गोपाळ पाटील (वय २०) आणि सहप्रवासी पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९, दोघे रा. तुरक गुर्‍हाडा, जि. बुर्‍हाणपूर, जि़ मध्यप्रदेश) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार निषाद कोंडे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात पौड फाटा येथील उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेश पाटील आणि त्याचा मित्र पुष्कर चौधरी हे दोघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सर्वेश पाटील याच्या दुचाकीवरुन ते पौड रोडकडे जात होते. पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी धडकली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार अडागळे तपास करीत आहेत.

You may have missed