Pune Alandi Crime News | आळंदीत पुजेसाठी आलेल्या दोघा ज्येष्ठांना डांबुन ठेवून 2 लाखांची मागितली खंडणी, आळंदी पोलिसांनी महिलेसह दोघांना केली अटक
पुणे : Pune Alandi Crime News | आळंदीत पुजेसाठी आलेल्या दोघा ज्येष्ठांना घरी नेऊन त्यांच्याकडे २ लाखांची खंडणी मागून त्यांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक करुन त्यांची सुटका केली.
याबाबत सदानंद दगडु गायकवाड (वय ३५, रा. अमरदास नगर, रिसोड, जि. वाशिम) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सचिन सुरेश मोरे Sachin Suresh More (वय ३०, रा. बाबा भगवाननगर, चर्होली खुर्द, ता. खेड) व एक महिला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना आळंदी येथील चाकण चौक येथे ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद गायकवाड यांचे वडिल दगडु शिवराम गायकवाड (वय ६२) आणि प्रशिक आंबोरे (वय ६०, दोघे रा. कवळा, ता. चिखली, जि. बुलढाणा) हे दोघे आळंदी येथे पुजेसाठी आले होते. ९ डिसेंबर रोजी दुपारी आळंदीतील चाकण चौकातून सचिन मोरे याने त्यांना आपल्या घरी नेले. तेथे त्यांच्याकडील मोबाईल काढून घेऊन ते बंद केले. त्यांना धमकी देऊन २ लाख रुपये दिल्यावरच तुमची सुटका करतो, असे सांगितले. त्या दोघांना एक दिवस डांबुन ठेवले. त्यांच्यापैकी एकाने आपली सुटका करुन घेऊन ते गावी गेले. त्यांनी सदानंद गायकवाड यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यांनी आळंदी पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी सचिन मोरे याच्या घरी जाऊन दोघांना ताब्यात घेऊन डांंबून ठेवलेल्याची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी तपास करीत आहेत.
