Pune BJP News | पुण्यासाठी एक हजार ई-बस, मेट्रोसह विमानतळाचा विस्तार ! भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर
पुणे : Pune BJP News | पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टीपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा “विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र” मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, पुणे हे सर्वसमावेशक राहण्यासाठी योग्य शहर बनत असून देशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून पुणे विकसित होत आहे. स्मार्ट सिटी योजनेत बाणेर–बालेवाडी भागाचा समावेश करून तेथे मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेत काम करण्याची संधी पुणेकरांनी भाजपला दिली आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.पुणेकरांना आता जुना कारभारी नको आहे.
पुण्यात सध्या ३२ किमी मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किमीपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील तीन वर्षांत साडेदहा कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी एक हजार ई-बसना मंजुरी देण्यात आली असून पुढील काळात साडेचार हजार ई-बस शहरात धावतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध होणार आहे.
पुणे विमानतळाच्या विस्तारास प्राधान्य देण्यात येत असून ४४ किमी नदीकाठ सुधार प्रकल्प वेगाने सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून शहराचा वारसा जपतानाच आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ, करदाते, आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण, सांस्कृतिक व आर्थिक विकास यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. पुणे शहराला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, ‘एम्स’ रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास आदी महत्त्वाकांक्षी संकल्पनांचा यात समावेश आहे. पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
