Pune Book Festival 2025 | पुणे पुस्तक महोत्सवाने राज्याची वाचन, कला, संस्कृती जोपासली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजेश पांडे लिखित गिनीजगाथा पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : Pune Book Festival 2025 | पुणे पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळाली असून, नवे दालन उपलब्ध झाले आहे. त्याला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज भारतातील आयकोनिक महोत्सव म्हणून पुणे पुस्तक महोत्सवाकडे पाहिले जाते. या महोत्सवात होणाऱ्या गर्दीला दर्दी वाचनप्रेमी म्हणावे लागेल. या महोत्सवाने नागरिकांना ज्ञान देत, त्यांना प्रगल्भ करण्याचे काम केले आहे. राज्याची कला, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा जोपासली आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पुस्तक महोत्सवाचे सोमवारी कौतुक केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीजगाथा पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुहाना ग्रुपचे संचालक विशाल चोरडिया, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह प्रा. आनंद काटीकर, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी शांतता…पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या छायाचित्रांच्या साहाय्याने विश्वविक्रम करण्यात आला असून, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या सहकार्याने झालेल्या या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात पुस्तके वाचली जातील का असा प्रश्न होता. मात्र, पुस्तकातील ज्ञान आणि माहितीचा संग्रह सर्वांना भावतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नवनवे विक्रम होतात. त्याला पुणेकर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. मोठ्या संख्येने पुस्तके खरेदी करीत आहेत, ही बाब वाचन संस्कृतीला पुढे नेणारी आहे. पुस्तके आणि ग्रंथ माणसाच्या ज्ञांच्या जाणीव विस्तरतात. त्यांच्यात प्रगल्भता वाढते आणि त्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते.
आपण ज्ञानी माणसे आणि विचार प्रवर्तक लोकांच्या सानिध्यात राहायला हवे. पुस्तकातून ज्ञान संपादित केल्याने व्यक्तिमत्त्व विकास विकास होतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशानंतर आम्ही नागपूर पुस्तक महोत्सव केला आणि आता फेब्रुवारी महिन्यात गोवा पुस्तक महोत्सव होत आहे. तेथेही उत्तम प्रतिसाद मिळेल. मराठी माणसे पुस्तकांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. महाराष्ट्र साहित्य निर्मितीसाठी नेहमी नंदनवन राहिले आहे. राज्यात अनेक साहित्य संमेलने होतात. महाराष्ट्र हे क्रांतिकारी विचार आणि सामाजिक विचारांचे प्रमुख केंद्र आहे. राज्याला लेखक आणि जाणकारांनी समृद्ध केले आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा राज्याची कला, संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा महोत्सव आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी महोत्सवाबाबत गौरवोद्गार काढले.
मलिक म्हणाले की, पुणेकरांचा वाचन केवळ छंद नाही, तर त्याची ती जीवनशैली आहे, हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशातून सिद्ध झाले आहे. पुणे पुस्तक महोत्सव ही एक केस स्टडी झाला आहे. हा पुस्तक महोत्सव वेगळ्या उंचीवर गेला आहे. आतापर्यंतच्या पुणे पुस्तक महोत्सवात एकूण १३ विश्वविक्रम झाले आहे, हे अद्भुत आहे.त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजेश पांडे यांचे अभिनंदन करायला हवे. या पुस्तकांच्या वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास होत असून, लहान मुलांवर चांगले संस्कार होत आहे. या पुणे पुस्तक पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानवान समाज घडवायचा आहे. हा महोत्सव विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारा ठरणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली असून, दिवसेंदिवस नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. या पुणे पुस्तक महोत्सवात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, ही माझी इच्छा आज पूर्ण झाली. या पुस्तकात माझ्या ४४ वर्षांचा जीवनप्रवास आहे. तो आपण सर्वांनी वाचावा.आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी एकत्रित काम करायचे असून, पुस्तकांच्या माध्यमातून चांगल्या समाजाची निर्मिती करायची आहे. कुलकर्णी यांनी आभार मानले.
विक्रमादित्य राजेश पांडे…
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक विक्रम कोणाच्या नावावर आहे अशी विचारणा झाल्यास, त्याचे उत्तर विक्रमादित्य राजेश पांडे असे सांगावे लागेल. लोक सहभागातून केलेले हे विषय विक्रम खरंच कौतुकास्पद असून, त्यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. डॉक्युमेंटेशन करण्यात आल्याचा आनंद आहे. आपल्याकडे नालंदा ग्रंथसंपदा खूप मोठी होती. मात्र, त्याच्या नोंदी नाहीत. या नोंदी आपल्याला चीनच्या लेखाकडून कळल्या. नोंदी नसल्याने, आपल्याला इंग्रजांचा इतिहास वाचवा लागत आहे. चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी डॉक्युमेंटेशन गरजेचे आहे. पुढील काळात या नोंदी अनेक लोकांना प्रेरित करतील. एककाळ असा येईल की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये किमान ५० टक्के विक्रम भारतीयांचे असतील. पुणे पुस्तक महोत्सवाला राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव केल्याबद्दल राजेश पांडे, पुणेकर आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
गिनीजगाथा पुस्तकाविषयी
पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित “गिनिजगाथा” या पुस्तकात लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या १२ गिनीज विश्व विक्रमांचा प्रवास आहे. राजेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषय हाती घेऊन २०१९ सालापासून सुरु झालेल्या या अनोख्या प्रवासात महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवक संघटना आणि सामान्य नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून देशाच्या नावे १२ गिनीज विश्व विक्रम नोंदवले गेले. हा प्रवास केवळ विक्रमांचा नसून, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, संघभावना आणि सकारात्मक सहभागाची चेतना निर्माण करणारा ठरला आहे.
विशेष म्हणजे यापैकी अनेक उपक्रमांत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी पाठबळ दिले असून, उपस्थितीही लावली आहे.पांडे यांनी या पुस्तकात गिनीज विक्रमांची संकल्पना, नियोजन, अंमलबजावणी, त्यामागील आव्हाने आणि युवकांच्या सहभागातून उभा राहिलेला लोकचळवळीचा प्रवास सविस्तरपणे मांडला आहे. गिनीजविश्व विक्रम हे माध्यम ठरले. मात्र, त्यातून घडलेली युवा पिढी हे या संपूर्ण प्रवासाचे खरे यश असल्याचे या पुस्तकातून अधोरेखित होते. युवकांची ऊर्जा, योग्य दिशा आणि सामूहिक प्रयत्न यांचे सामर्थ्य या पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर येणार आहे.
