Pune Court News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, लष्करातील हवालदाराचा जामीन अर्ज फेटाळला

court danduka

पुणे : Pune Court News | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी लष्करातील हवालदाराचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस.आर नरावडे यांनी फेटाळला आहे. ३० वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरोधात अत्याचार, धमकावण्यासह ऍट्रॉसिटी कायद्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आरोपीची दोन लग्ने झाली असून, त्याने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून तरुणीशी संपर्क साधला होता. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला,असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडी झाल्यावर आरोपीने जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केल होता. तसेच बेकायदा अटक करण्यात आल्याचा दावा करत न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याची मागणी केली. विशेष सरकारी वकील भारती कदम आणि तक्रारदार तरुणीचे वकील ऍड. केतनकुमार जाधव यांनी आरोपीला जामीन देण्यास विरोध केला.

लष्कर हा देशाचा कणा असून, आरोपीने लष्कराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने तरुणीला धमकावले असून, ती दहशतीखाली असल्याचे त्यांच्या चॅटिंगमधून निदर्शनास येते. आरोपीची जामीनावर सुटका झाल्यास तरुणीच्या जिवाला धोका निर्माण होईल, तसेच पुराव्यांशी छेडछाड करेल, असे आदेशात नमूद आहे.

You may have missed