Pune Crime Branch News | धायरीतील शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेणारा चोरटा गजाआड; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने दीड महिन्यानंतर गुन्हा आणला उघडकीस, सराफासह चौघांना अटक,

पुणे : Pune Crime Branch News |दुचाकीवरुन जाणार्या शिक्षिकेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून नेणार्या चोरट्याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी पकडले. सराफासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
तेजस नितीन वायदंडे (वय २२, रा. चाफेकर चौक, चिंचवड गाव) मुळ रा. लासुर्णे, जि. सातारा) आणि त्याचे साथीदार वैभव राजेश कांबळे (वय २७, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) आणि सचिन मल्लिकार्जुन स्वामी (वय २७, रा. साई कॉम्प्लेक्स, नखाते वस्ती, रहाटणी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत धायरीत राहणार्या एका ३५ वर्षाच्या शिक्षिकेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या २४ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजता धायरीतून कात्रजकडे दुचाकीवर जात होत्या. यावेळी धायरी फाटा येथील सणस शाळेच्या सिमा भिंतीजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे २५ ग्रॅमचे मंगळसुत्र हिसकावून नेले होते.
या गुन्ह्याचा तपास चैन – स्नॅचिंग पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बेरड व अंमलदार करत होते. तांत्रिक विश्लेषण करुन व मिळाले या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांना हा गुन्हा तेजस वायदंडे याने केल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना तो हडपसर येथील वैदवाडी येथे मोटारसायकलसह उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन तेजस वायदंडे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले मंगळसुत्र हे त्याने ओळखीचा मित्र वैभव कांबळे याच्या करवी सचिन स्वामी याला दिले. त्याने ते त्याच्या ओळखीचे ज्वेलर्सकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगडतीत एक सोन्याची अंगठी मिळून आली. त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सोन्याचे मंगळसुत्र घेणार्या सराफालाही अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्यातील मंगळसुत्र व अंगठी असा २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक सी बी बेरड, पोलीस अंमलदार नाळे, साळवे,डापसे, राहुल इंगळे, बंटी सासवडकर, तनपुरे, गणेश ढगे, इरफान पठाण, अजित शिंदे, अमित गद्रे, गणेश गोसावी, मनोज खरपुडे यांनी केली आहे.