Pune Crime Court News | सरपंच महिलेच्या पतीच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप
बारामती : Pune Crime Court News | तालुक्यातील सोनगाव येथे सरपंच महिलेच्या पतीचा खून करणाऱ्या कामगाराला बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीवर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजय बर्डे यांनी हा निकाल दिला. पनीश उर्फ पांग्या आनंद्या भोसले असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सोनगाव येथील युवराज थोरात (वय ५०) यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी युवराज थोरात यांच्या मुलाने बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
ही घटना १५ जानेवारी २०२० रोजी बारामतीतील नीरा–कऱ्हा नदीच्या संगमावर असलेल्या सोनेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर घडली. मकरसंक्रांतीनिमित्त युवराज थोरात दर्शनासाठी मंदिरात आले असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. “आता सरपंच झाल्याने खूप माज आला आहे, एकेकाला भोसकून काढतो,” अशी धमकी देत आरोपीने युवराज थोरात यांच्यावर सुरा भोसकून घटनास्थळावरून पळ काढला.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. सरकार पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुरा हे महत्त्वाचे पुरावे ठरले.
नेमके काय घडले होते?
२०२० साली मकरसंक्रांतीच्या दिवशी सोनगाव येथे ही धक्कादायक घटना घडली होती. सरपंच जयश्री युवराज थोरात यांचे पती युवराज थोरात यांची सोनेश्वर मंदिराजवळ एका तरुणाने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. एका महिलेला त्रास देणाऱ्या तरुणाला थोरात यांनी रोखल्याने आरोपीचा राग अनावर झाला आणि त्यातूनच हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पारधी समाजाची काही घरे पेटवून दिल्याने परिसरातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली होती.
