Pune Crime Court News | हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटल घटनेप्रकरणी कॅन्टोन्मेंट न्यायालयाकडून सर्व आरोपींना जामीन मंजूर
पुणे : Pune Crime Court News | सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर येथे घडलेल्या घटनेसंदर्भात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी पुणे येथील माननीय न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC), कॅन्टोन्मेंट न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणातील घटनाक्रम असा आहे की आरोपी क्रमांक १ यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. सदर मृत्यू डॉक्टर व रुग्णालय व्यवस्थापनाच्या कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर तीव्र मानसिक आघात झाला. या भावनिक तणावातून रुग्णालयाच्या आवारात झालेला उद्रेक हीच सदर प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचे बचाव पक्षाकडून मांडण्यात आले. ही बाब अॅड. प्रियांका जाधव-काटकर (Adv. Priyanka Jadhav-Katkar) आणि अॅड. श्रद्धा प्रकाश जाधव (Adv. Shraddha Prakash Jadhav) यांनी सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडली.
प्रकरणातील सर्व तथ्ये, आरोपांचे स्वरूप, घटनेची परिस्थिती, आरोपींची भूमिका तसेच जामीन देताना विचारात घेतले जाणारे कायदेशीर निकष लक्षात घेऊन माननीय न्यायालयाने आपला विवेकाधिकार वापरत सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन हा नियम असून कारावास हा अपवाद आहे, या प्रस्थापित न्यायसिद्धांताचा अवलंब करत न्यायालयाने हा आदेश पारित केला.
आरोपींच्या वतीने अॅड. श्रद्धा प्रकाश जाधव आणि अॅड. प्रियांका जाधव-काटकर यांनी प्रत्यक्ष हजर राहून जामीन अर्ज प्रभावीपणे युक्तिवादासह मांडले व ते यशस्वीरीत्या मंजूर करून घेतले. सदर कामकाजात अॅड. कुणाल सोनवणी, अॅड. अथर्व पिंगळे तसेच चिराग गावंदे यांनीही वकिलांना मोलाचे सहाय्य केले.
सर्व आरोपींनी भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, कायद्यानुसार उपलब्ध असलेले योग्य व वैधानिक उपाय पुढील काळात अवलंबण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून तपास व न्यायप्रक्रियेला संपूर्ण सहकार्य करण्याची हमीही त्यांनी दिली आहे.
