Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; हडपसरमधील 2018 च्या घटनेचा 7 वर्षांनी निकाल

court danduka

पुणे : Pune Crime Court News | घरात एकटी असल्याचे पाहून घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

भिमराव मुकिंदा कांबळे (वय २७, रा. पुयना समाज मंदिराजवळ, साडं, ता. कळमनुर, जि. हिंगोली) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना फुरसुंगी येथील वाकवस्तीवर डिसेंबर २०१७ मध्ये घडली होती. फिर्यादी अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. हे पाहून भिमराव कांबळे आत शिरला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने कोणाला याची माहिती दिली नव्हती. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी केला. विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला. सबळ साक्षीपुराव्याअंती पोक्सोच्या विशेष न्यायालयाने आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे याला २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विकास घोगरे पाटील, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे व ए जे गोसावी यांनी काम पाहिले. या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार म्हांगरे, गोसावी व तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

You may have missed