Pune Crime Court News | गँगस्टर टिपू पठाण टोळीतील कुख्यात गुंडाला मोक्काच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन
पुणे : Pune Crime Court News | गँगस्टर टिपू पठाण याच्याविरुद्ध पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्याने अतिक्रमण करुन बांधलेले बांधकाम पाडून टाकले. त्याच्या मालमत्तेवर टाच आणून त्याची आर्थिक कोंडी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु असतानाच न्यायालयाने टिपू पठाण याचा कुख्यात साथीदार अजिंक्य उंद्रे याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अजिंक्य बाळासाहेब उंद्रे Ajinkya Balasaheb Undre (रा. मांजरी खुर्द) असे अटकपूर्व जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.
टिपू पठाण याने महिलेच्या जागेत अतिक्रमण करुन तिचा बोर्ड तोडून टाकून तेथे आपला बोर्ड लावला. शेड बांधून भाड्याने देऊन ते भाडे तो घेत होता. ही जागा परत पाहिजे असल्याचे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी टिपू पठाण, त्याचा भाऊ एजाज सत्तार पठाण यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजिंक्य उंद्रे हा तेव्हापासून फरार आहे. त्यानंतर सय्यदनगर येथील आणखी एका मिळकतीत टिपू पठाण व त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने घुसून तिचा ताबा घेतला होता. फिर्यादी यांनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुंबईला जेथे राहत आहे तेथेच रहा, पुन्हा या परिसरात दिसला तर जिवंत जाणार नाही, जागेचा ताबा हवा असेल तर २५ लाख रुपये द्या अशी धमकी दिली होती. याबाबत ऑक्टोंबर २०२५ मध्ये टिपू पठाण व इतरांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजिंक्य उंद्रे हा टिपू पठाण याच्या टोळीचा सदस्य आहे. २०१९ मध्ये गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अजिंक्य उंद्रे याचा सहभाग होता.
मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या समोर अॅड. अफरोज शेख (Adv. Afroz Shaikh) यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी अॅड. अफरोज शेख यांनी युक्तीवाद केला की, ही खंडणीची रक्कम कधी, कोणी मागितली, त्याचा काहीही उल्लेख नाही. या गुन्ह्यात अजिंक्य उंद्रे यांचा वैयक्तिक असा कोणताही फायदा नाही. अशाच प्रकारच्या अगोदरच्या गुन्ह्यामध्ये असेच आरोप करण्यात आले होते. त्यात आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे. या गुन्ह्यातही अटकपूर्व जामीन देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून सरकारी वकील, तपास अधिकार्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी २० डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
