Pune Crime Court News | दशभुजा मित्र मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप

Pune Court News

पुणे :  अनैतिक संबंधामुळे इमारतीतील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या कारणावरून महिलेसमोरच मारहाण केल्याच्या रागातून गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

संजय अनंत मोहोळ Sanjay Anant Mohol (वय 39, रा. दत्तवाडी) आणि संभाजी सदाशिव कांबळे Sambhaji Sadashiv Kamble (वय 27, रा. कोथरूड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. त्यांना जन्मठेपेसह 27 हजारांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असेही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांनी निकालात नमूद केले आहे.

सागर शिंदे (वय 31, रा. कर्वे रोड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते दशभुजा गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष होते. याप्रकरणी, त्याचे वडील शिवाजी शिंदे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या सोसायटीतील महिलेशी संजय याचे अनैतिक संबंध होते. त्याचा येथील रहिवाशांना त्रास होत होता. खुनाच्या घटनेच्या दीड वर्षापुर्वी सागर याने संजय याला समजावित त्या महिलेसमोर लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. तसेच, संभाजी यास संजयची संगत सोडण्याची ताकद दिली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2016 रोजी सागर हा दुचाकीवरून करिष्मा चौकाकडे निघाला होता. यावेळी, आरोपींनी चारचाकीतून येत त्याच्या दुचाकीला धडक दिली. रस्त्यावर पडल्यानंतर सागर आरोपींना पाहून त्याठिकाणाहून पळून जाऊ लागला. आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी रुग्णालयात तो मयत झाला होता.

याप्रकरणी, अलंकार पोलिसांच्या वतीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर (Adv Pramod Bombatkar) यांनी काम पाहिले. याप्रकरणात त्यांनी अठरा साक्षीदार तपासले. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तीन डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच सागर याला दवाखान्यात नेत असताना त्यांचे वडील शिवाजी शिंदे यांकडे मृत्युपुर्व जबाब देवुन आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. यावेळी न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, पंच, साक्षीदार तसेच तपासी आधिकाऱ्यांचे जबाब याआधारे आरोपीला दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, दंडाच्या रक्कमेतून सागर याच्या वडील व मुलांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत मे. कोर्टाने वरीलप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

You may have missed