Pune Crime News | 5 अल्पवयीन मुलांसह वाहन चोरट्याकडून 10 दुचाकी, 7 मोबाईल आणि इलेक्ट्रिक सायकल हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे : Pune Crime News | का चोरट्यासह त्याच्या पाच अल्पवयीन साथीदारांकडून खडक पोलिसांनी १० दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे ७ मोबाईल, एक इलेक्ट्रिक सायकल असा २ लाख ३९ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. (Khadak Police)
मुनावर इम्तियास शेख (वय १८, रा. १० नंबर कॉलनी, काशेवाडी, भवानी) असे या चोरट्याचे नाव असून त्याच्या ५ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वाहनचोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून खडक पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजीत गोरे, शुभम केदारी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरटा १० नंबर कॉलनी येथे आहे. या माहितीच्या अनुशंगाने पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन मुनावर शेख याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची निघाली. भवानी माता मंदिरासमोरुन चोरली असल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने आपण इतर ५ अल्पवयीन मुलांच्या साथीने बजाज पल्सर, टीव्हीएस वेगो, यामाहा आरएक्स १००, होंडा डिओ, अॅक्सेस होंडा, स्प्लेंडर प्लस, केटीएम ड्युक अशा १० मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी या १० मोटारसायकली तसेच ७ मोबाईल व एक इलेक्ट्रिक सायकल असा २ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला आहे. खडक पोलीस ठाण्यातील ५ गुन्हे, लष्कर, विश्रामबाग, समर्थ, कोरेगाव पार्क येथील प्रत्येकी एक अशा वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून चोरीचे जप्त केलेले ७ मोबाईल आणि इलेक्ट्रिक सायकलच्या मालकांचा शोध सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजीत गोरे, योगेश चंदेल, शुभम केदारी, मयुर काळे, शोएब शेख यांनी केली आहे.