Pune Crime News | १०४ कामगारांची बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक ! भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच नाही, कंपनी अस्तित्वातच नाही, कामगारांना धमक्या मिळू लागल्याने उघड झाला प्रकार

fraud

पुणे : Pune Crime News | गणेश इंटरप्रायजेस ही कंपनी अस्तित्वातच नसताना तिच्या नावाने १०४ कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात २०२० मध्ये भविन्य निर्वाह निधी (पीएफ) खाती उघडण्यात आली. पाच वर्षामध्ये ही खाती बनावट असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच लागला नाही. यातील काही कामगारांना पीएफची खाती रद्द करण्यासाठी धमकावून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट खाती उघडण्यात आल्याचे समजले तरी त्याबाबत तक्रार करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तब्बल ८ महिन्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत भविष्य निर्वाह निधी संघटनाचे इन्फोर्समेंट अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ डिसेंबर २०२० रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गणेश इंटर प्राजयेस प्रो. प्रा. सिताराम ठकाणसिंग (रा. साठेवस्ती, सणसवाडी) यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या वेबसाईटवर श्री गणेश इंटर प्रायेजस नावाने पीएफचा कोड रजिस्टेशन करण्यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन केले. त्यांना संघटनेकडून कोड नंबर देण्यात आला. या कंपनीमध्ये २०२० ते २०२४ मध्ये १०४ कामगारांची पीएफ खाती ऑनलाईन उघडण्यात आलेली आहेत.

श्री गणेश इंटरप्रायजेस या अस्थापनामधील भारतामधील वेगवेगळ्या राज्यातील ११ कर्मचारी यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्राद्वारे, ईमेलद्वारे जून व जुलै २०२४ मध्ये तक्रारी केल्या. त्यात त्यांनी श्री गणेश इंटर प्रायजेस मध्ये त्यांनी कधीही काम केलेले नाही़ त्यांचे संमतीविना परस्पर त्यांचे नावे श्री गणेश इंटरप्रायजेस मध्ये पीएफची बनावट खाती उघडली आहेत. त्यांना ही पीएफची खाती रद्द करण्यासाठी कोणीतरी व्हॉटसअ‍ॅपवरुन मेसेज पाठवून पैसे मागत आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत ४ कर्मचार्‍यांनी ते रहात असलेल्या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या आहेत.

भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त यांनी श्री गणेश इंटरप्रायेज कंपनी व कंपनी मालकाचे व्हेरीफिकेशन करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश १८ व २४ जुलै २०२४ रोजी दिले होते. त्यानुसार फिर्यादी तसेच त्यांचे सहकारी डी एस तिलवणकर, प्रवर्तन अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी शिरुरमधील सणसवाडी येथील साठे वस्तीवर गेले. तेथे जाऊन पडताळणी केल्यावर त्या पत्यावर श्री गणेश इंटर प्रायजेस नावाची कोणतीही संस्था आढळून आली नाही. तसेच तेथील परिसरातील नागरिकांकडे चौकशी केल्यावर त्या नावाची कोणतीही व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाली नाही. सणसवाडी ग्रामपंचायतीत चौकशी केल्यावर तेथेही श्री गणेश इंटरप्रायजेस नावाची संस्था किंवा कंपनी मालक सिताराम ठकाणसिंग यांची नावे आढळून आली नाही. तसा अहवाल त्यांनी १ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यालयाला दिला. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनंतर भविष्य निर्वाह कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सिताराम ठकाणसिंग याने केवळ पीएफ खातीच बनावट काढली नाही तर शॉप अ‍ॅक्ट लायन्सनही बनावट काढले आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करीत आहेत.
या १०४ कामगारांची बनावट खाती काढण्यात आली़ तरी त्या खात्यात कंपनी मालक दर महिन्यांना पैसे भरत होता का?. ती बनावट खाती असेल व त्या खात्यात पैसे भरले जात नसतील तर इतकी वर्षे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या कसे लक्षात आले नाही. तसेच तेथे कंपनीच अस्तित्वात नसेल तर शॉप अ‍ॅक्ट लायसन कसे दिले गेले. तसेच इतक्या वर्षात कोणी तपासणी केली नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

You may have missed