Pune Crime News | खेळता खेळता पिस्तुलमधून गोळी उडून 17 वर्षाचा मुलगा झाला जखमी

Pune Crime News | 17-year-old boy injured after being shot while playing with pistol

पुणे : Pune Crime News | खेळता खेळता पिस्तुलमधून गोळी उडून त्यात एक १७ वर्षाचा मुलगा जखमी झाला. खासगी हॉस्पिटल व ससून रुग्णालयात या मुलावर २ दिवस उपचार करण्यात येत होते. परंतु, दोन्ही हॉस्पिटलने इतकी मोठी गंभीर बाब पोलिसांना कळविलीच नाही. जखमी मुलाची आई व आजी मुंढवा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मुंढवा पोलिसांनी तिघांना अटक करुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

हरिष नितीन जाधव (वय १७, रा. गुलमोहर कॉलनी, हडपसर रेल्वे स्टेशनजवळ, मुंढवा) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सक्षम युवराज गायकवाड Saksham Yuvraj Gaikwad (वय १९), ओम दुर्गा गायकवाड Om Durga Gaikwad (वय १९, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), सोनु ऊर्फ सोन्या मुंडे ऊर्फ सुमित सुजित बर्णवाल Sonu alias Sonya Munde alias Sumit Sujit Barnwal (वय २१, रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार केशवनगर येथील गुरुकृपा सोसायटीचे पाठीमागील मोकळ्या जागेत १८ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलगा आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. सोन्या मुंडे याने एक पिस्टल आणले होते. ही सर्व मुले ते पिस्टल पाहून ते एकमेकांच्या हातामध्ये घेऊन गोळी मारण्याची अ‍ॅक्शन करत होते. त्या पिस्टलमध्ये गोळी आहे. तिचा चाप ओढला तर गोळी उडून कोणाच्या जिवावर बेतेल, हे त्यांनी लक्षातच घेतले नाही. एकमेकांकडे पिस्टल देऊन ते खेळत होते. त्यावेळी सोन्या याने पिस्टल त्याच्या हातात घेऊन गोळी मारण्याची अ‍ॅक्शन केली. त्यावेळी अचानक चाप दाबला गेल्याने गोळी उडून ती हरिष जाधव याच्या पोटाला कमरेच्या वर लागून तो जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार करण्यात आल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले.

१८ मार्च रोजी रात्री ही घटना घडल्यानंतर खासगी हॉस्पिटल व ससून रुग्णालयात या मुलावर उपचार करण्यात आले तरी त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. २१ मार्च रोजी जाधव याची आई व आजी मुंढवा पोलीस ठाण्यात आल्यावर या गोळीबाराची आणि त्यात हरिष जाधव हा जखमी झाल्याची पोलिसांना माहिती झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी भेट दिली. मुंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जखमी मुलाची माहिती पोलिसांना का कळविण्यात आली नाही, याची विचारणा खासगी हॉस्पिटल व ससून रुग्णालयाला करण्यात येणार आहे.

सोन्या मुंडे याने हे पिस्टल कोठून आणले. कशासाठी जवळ बाळगले होते, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले करीत आहेत.

You may have missed