Pune Crime News | मैत्रिणीच्या मदतीने बोलावून 17 वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खेड शिवापूरला केली हत्या; विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | भांडणामुळे मुलावर गुन्हे दाखल झाल्याचे पाहून आई मुलाला घेऊन उत्तमनगरमधून टिंगरेनगरला रहायला गेली. परंतु, जुन्या भांडणाच्या कारणावरुन मैत्रिणीच्या मदतीने १७ वर्षाच्या मुलाला बोलावून घेऊन त्याचे अपहरण केले. अपहरण करणार्या दोघा अल्पवयीन मुलासह चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुलाचा दगड व कोयत्याने वार करुन खुन केल्याचे सांगितले. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी खुन केला असल्याचे सांगितले तरी खेड शिवापूर येथील मृतदेह अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रथमेश चिंधु आढळ Prathamesh Chindhu Aadal (वय १९, रा. उत्तमनगर), नागेश बालाजी धबाले Nagesh Balaji Dhabale (वय १९, रा. शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे.
अमनसिंग गचंड याची आई ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आली. त्यांचा मुलगा अमनसिंग हा २९ डिसेंबर रोजी दुचाकी घेऊन गेला तो परत आला नसल्याची तक्रार केली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद करुन घेऊन तपास सुरु केला. अपहरण झालेल्या मुलाचे मोबाईलचे सीडीआर व लोकेशन वरुन पोलिसांना तो उत्तमनगर येथे गेल्याचे दिसून आला. विश्रांतवाडी पोलीस व गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक शोध घेत असताना पोलीस अंमलदारांना गोपनीय बातमी मिळाली की, अमनसिंग गचंड याला उत्तमनगर येथील प्रथमेश आढळ व नागेश धबाले यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरुन बोलावून घेऊन अपहरण केले आहे.
या दोघांचा शोध घेतल्यानंतर ते कर्नाटकातील बेळगाव येथे असल्याचे समजले. तेथून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी अमन गचंड याला खेड शिवापूर येथे नेले. तेथे दगड व कोयत्याने मारुन खुन केल्याची कबुली दिली. या कबुलीवर विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दोघा अल्पवयीन मुलांना निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
अमनसिंग गचंड त्याची आई अनिता सुरेंद्रसिंग गचंड व त्यांचा भाऊ हे पूर्वी उत्तमनगर येथे रहात होते. तेथील मुलांबरोबर वारंवार भांडणे होत होती. अमनसिंग गचंड हा अल्पवयीन असून त्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्याच्या भावावरही गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे गचंड हे १० दिवसांपूर्वी उत्तमनगरहून टिंगरेनगरला रहायला आले होते. २९ डिसेंबर रोजी अमनसिंग गचंड घरातून गेला़ तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने दोन दिवसांनी ३१ डिसेंबर रोजी दिली आहे. खेड शिवापूर येथे आरोपींनी अमनसिंग गचंड याचा कोठे खुन करुन मृतदेह टाकला याचा शोध सुरु असल्याचे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी सांगितले.
विश्रांतवाडी पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस पथक यांनी ही कामगिरी केली आहे.
