Pune Crime News | मुलगी असल्याने घातलेल्या बंधनामुळे 17 वर्षाच्या युवतीने उचलले टोकाचे पाऊल; वडिलांना जबाबदार धरल्याने पोलिसांनी वडिलांविरुद्ध दाखल केला गुन्हा
पुणे : Pune Crime News | वयात आल्यानंतर मुलगी असल्याने वडिलांनी घातलेल्या बंधनामुळे १७ वर्षाच्या मुलीने वडिलांच्या त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहून टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संजिवनी जीवन रोडे (वय १७, रा. आशिष प्लाझा, जिजाबाईनगर, नांदेड गाव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिच्या आईने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जीवन गणपती रोडे (वय ४५, रा. आशिष प्लाझा, जिजाबाईनगर, नांदेडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन रोडे हे मुळचे बीड जिल्ह्यातील असून पुण्यात येऊन ते मोलमजुरी करतात. त्यांना ५ मुली व एक मुलगा आहे. संजिवनी रोडे ही तिसरी मुलगी आहे. ती शाळा शिकत होती. परंतु, नंतर तिची शाळा बंद करण्यात आली. जीवन रोडे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो नेहमी दारु पिऊन आपली पत्नी व मुलींना घाणेरड्या शिवीगाळ करत असे. संजिवनी हीची शाळा बंद करुन तिला बाहेर येण्या जाण्यावर तिच्या वडिलांनी बंधने आणली होती. त्यामुळे तिने वडिलांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
