Pune Crime News | सोशल मीडियावरील प्रेमातून 2 अल्पवयीन मुली पोहचल्या राजस्थानमध्ये; काळेपडळ पोलिसांनी 3300 किमीवरुन फुस लावणार्या दोघांना पकडून मुलींना आणले सुखरुप परत
पुणे : Pune Crime News | एकाच ठिकाणी लिखाणाचे काम करणार्या दोघी मैत्रिणी. एकमेकासाठी काहीही करायला तयार असणार्या या १७ व १६ वर्षाच्या मुलींपैकी एकीचे इन्स्टाग्रामवरुन एकाशी सुत जुळले. एक महिन्यांच्या चॅटिंगमधून ती त्याच्या प्रेमात पडली. त्याच्या बोलवण्याने ती राजस्थानला जाण्यास तयार झाली. तिच्याबरोबर दुसरीही राजस्थानला गेली. काळेपडळ पोलिसांनी तब्बल ३३०० किमीचा प्रवास करुन या दोन्ही मुलींना सुखरुप पुण्यात आणले. त्याचबरोबर त्यांना फुस लावणार्या दोघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
सुरेशकुमार वडदाराम प्रजापती Sureshkumar Vaddaaram Prajapati (वय २१, रा. राणी, राजस्थान) आणि सुरेशकुमार मोहनलाल राणीभील Suresh Kumar Mohanlal Ranibhil (वय ३१, रा. राणी, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही काही कामधंदा करत नाही.
सोशल मीडियावरुन सुरेशकुमार प्रजापती याचे एका मुलीशी सुत जुळले. त्याने तिला राजस्थानला आपल्या गावी बोलविले. तिने हे आपल्या मैत्रिणीला सांगितले. तीही तिच्याबरोबर जाण्यास तयार झाली. दोघींनी २८ नोव्हेंबर रोजी कामाला जात असल्याचे सांगत, मुंबई गाठली व तेथून त्या राजस्थानला पोहचल्या. इकडे पुण्यात रात्री मुली घरी न आल्याने दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांकडे चौकशी केल्यावर दोन्ही मुली घरी आल्या नसल्याचे लक्षात आले. त्यांनी २९ नोव्हेंबर रोजी काळेपडळ पोलिसांकडे मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. अल्पवयीन मुली त्यात दोन्ही जणी म्हटल्यावर पोलीस अलर्ट झाले. काळे पडळ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथकही तपासात सहभागी झाले.
मुलींच्या मोबाईलचे व सोशल मीडियाचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर त्यांचे लोकेशन राजस्थान दिसून येत होते. सहायक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे व त्यांचे सहकारी यांनी या मुली आणि संशयित आरोपीचा वापी, सुरत, अहमदाबाद, फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपूर असा जवळपास ३३०० किमीचा प्रवास करुन आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यातील एक मुलगी राजस्थानमधील राणी येथे सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१) याच्या समवेत मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर दुसरा आरोपी आणि मुलगी हे तेथून पळून गेले होते.
पोलिसांनी सुरेशकुमार याच्याकडे आपल्या पद्धतीने चौकशी केल्यावर त्याने मुलीला बोलावून घेतल्याची कबुली दिली. परंतु, आपली फक्त एकाच मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख होती. पण, पुण्याहून दोन मुली आल्या. तेव्हा त्याने त्याचा मित्र सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१) याच्याबरोबर दुसर्या मुलीची ओळख करुन दिली. ते दोघे पाली येथे गेल्याचे समजले. त्यावरुन पोलीस पथक पाली येथे जाऊन त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
सोशल मीडियावरील प्रेमातून या दोघी कोणाला काही न सांगता थेट राजस्थानला पोहचल्या तेथे गेल्यावर मात्र त्यांना आपण येथे येऊन चुक केल्याचे लक्षात आले. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र कसे ठरु शकते, याचे हे एक जिवंत उदाहरण बनले आहे.
काळेपडळ पोलिसांनी या दोघांवर भारतीय न्याय संहिता क्रं. ६४, ६५(१), ६९), ७१, ९६, १३७ (२), ३ (५), पोक्सो ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे, तसेच गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलीस अंमलदार शशिकांत नाळे व गणेश माने यांनी केली आहे.
