Pune Crime News | बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली 39 लोकांना 15 लाखांचा गंडा, फसवणुकीचाही गुन्हा दाखल, पाच जणांना अटक

पुणे : Pune Crime News | महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली ३९ लोकांकडून शुल्क म्हणून १५ लाख ७८ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक केलेला शोधन भावे हा मुंबईत असल्याचे समजल्यावर या कर्ज मंजूरीसाठी पैसे दिलेल्या लोकांनी त्याला पकडून येरवडा पोलिसांकडे आणले. पोलिसांनी भावे याचे अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा या लोकांवर दाखल केला. तर फसवणूक केल्याबद्दल शोधन भावेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत लवीना अमोदन मरियन (वय ४७, रा. आदर्शनगर सोसायटी, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार, शोधन भावे आणि राजेश कानभास्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सम्राट अशोक सेना नावाची संस्था यांनी महाराष्ट्र बेरोजगार परिषदेचे कार्यालयात नोव्हेबर २०२४ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोधन भावे व इतरांनी संगनमत करुन महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचा आमिष दाखविले. त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. त्यांचे कर्ज फाईल करण्याचे शुल्क म्हणून पैसे घेतले. परंतु, त्यांनी कर्ज मंजूर करुन न देता लोकांची फसवणूक केली. फिर्यादी आणि अन्य ३९ लोकांकडून यांनी १५ लाख ७८ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण तपास करीत आहेत.
त्याविरुद्ध शोधन अनिल भावे (वय ५७, रा. करण क्लारिसा सोसायटी, वारजे) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वैष्णवी पाठक (वय ३५), दिनेश येवले (वय ४०), अविनाश पाठक (वय ४०), आशपाक कासीम आगा (वय ३५) अमोघन अॅलेक्स (वय ३६) आणि राजेश शेषनारायण कंट्रोलु (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंबईतील अंधेरी येथील कलिंगा हॉटेल ते येरवड्यातील गुंजन चौक दरम्यान ९ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून कर्ज फाईल मंजूर करण्याचे शुल्क म्हणून १५ लाख ७८ हजार रुपये घेतली होते. त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर केले नाही म्हणून कर्ज मागणार्यांनी शोधन भावे याचा शोध घेतला. तो अंधेरी येथील हॉटेल कलिंगामध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला तेथून लोकांनी घेऊन पुण्यात आणले. गुंजन चौकात आणल्यानंतर त्याला मारहाण केली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके तपास करीत आहेत.