Pune Crime News | मेडिकल दुकानादारांना 10 कोटींचा गंडा घालणार्या सोनाली गिरीगोसावी, जयेश जैनवर 4 गुन्हे दाखल
पुणे : होलसेल औषध विक्रेत्यांकडून उधारीवर माल घेऊन त्यांना पोस्ट डेड चेक देऊन १० कोटी रुपयांचा गंडा घालणार्या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी Sonali Laxman Girigosavi (वय ४२, रा. मोहम्मदवाडी) जयेश वसंत जैन Jayesh Vasant Jain (वय ४१, रा. गुलटेकडी) अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांच्यावर ६ कोटी १९ लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. जून मध्ये निलेश सोनिगरा यांची या दोघांनी ४ कोटी ४० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाल करुन या आरोपींवर कारवाई न केल्याने त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी होऊन त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
याबाबत सुधीर चिंतामण टेंबर (रा. विश्वनाथ अपार्टमेंट, शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोनाली गिरीगोसावी व जयेश जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ ते मे २०२५ दरम्यान घडला. त्यांच्याकडून या दोघांनी उधारीवर औषधे खरेदी करुन त्यांचे पैसे न देता ३ कोटी ७ लाख ९६ हजार ८२३ रुपयांची फसवणुक केली आहे.
मुकेश नारायणदास खाटेर (वय ५०, रा. माकेटयार्ड) यांच्या निलु अँड कंपनी या शुक्रवार पेठेतील दुकानातून १ कोटी ३७ लाख ८२ हजार ४७८ रुपयांची औषधे खरेदी करुन फसवणुक केली आहे.
अमोल लक्ष्मीकांत क्षीरसागर (वय ४८, रा. विष्णु विहार, बिबवेवाडी) यांच्या सदाशिव पेठेतील धनश्री एजन्सीज मधून १ कोटी ७३ लाख ६३ हजार ४६ रुपयांची औषधे खरेदी करुन फसवणुक केली आहे. या सर्व घाऊक औषध वितरकाकडून त्यांनी २०२३ पासून मे २०२५ पर्यंत औषधे खरेदी केली.
सोनाली गिरीगोसावी हिने सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ येथील अनेक दुकानदारांकडून औषधे खरेदी करत होती. उधारीने माल द्यावा, यासाठी तिने एकमेकांच्या दुकानदारांचा संदर्भ देत असे. या दुकानदारांनी तिला माल पुरविणार्या व्यापार्यांकडे चौकशी केल्यावर सोनाली गिरीगोसावी ही माल दिल्यानंतर ३ ते ४ दिवसात चेकद्वारे बिलाचे पेमेंट होत आहे, अशी माहिती मिळत. त्यामुळे तेही तिला उधार माल देऊ लागले. ती वानवडी येथील शिवरकर गार्डनसमोर ओम साईनाथ मेडिकल असल्याचे सांगून त्या नावाने व्यवहार करत असे. सुरुवातीला काही बिलांचे पेमेंट केल्यानंतर ती मालाचे रक्कमेवर ४५ दिवसांची उधारीची मुदत व ४ टक्के डिस्काऊंट मागत असे. मोठी ऑर्डर असल्याने हे व्यापारी माल देत असत. काही काळाने सोनाली गिरी गोसावी आपण हा माल जयेश जेन याला पुरवत असून तो पुढे एक्सपोर्ट व शासकीय रुग्णालय यांना पुरवितो, असे सांगत. त्याच्या मागणीप्रमाणे माल देत जा असे सांगत. जयेश जैन हा माल घेऊन जाऊन मॅडमला त्याचे पेमेंट करेन. तुमचे पेमेंट मॅडम करतील, असे सांगत. मे २०२५ पर्यंत त्यांनी कोट्यावधींचा माल घेतला. त्यानंतर सोनाली गिरीगोसावी हिने वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करु लागली. तिने दिलेले पोस्ट डेटेड चेक बँकेत भरल्यावर ते शिल्लक नसल्याने परत येऊ लागले. याबाबत निलेश सोनीगिरा यांची जुन मध्ये ४ कोटी ४० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलिसांनी दाखल करुन घेतला होता़. त्यानंतर आता आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
