Pune Crime News | केसनंदमध्ये बनावट मतदान करणार्या 6 मजुरांना पकडले; निवडणुक अधिकार्यांनी केले हात वर, पोलिसांनीच पुढाकार घेऊन केला गुन्हा दाखल केली अटक
पुणे : Pune Crime News | केसनंदमधील जोगेश्वरी विद्यालयात बनावट आधार कार्डाच्या आधारे मतदान करुन आलेले तिघे आणि मतदानांसाठी रांगेत थांबलेले तिघे अशा ६ जणांना कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथील निवडणुक अधिकार्यांनी तक्रार देण्यास नकार देऊन हात वर केले. शेवटी पोलिसांनीच फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला व ६ जणांना अटक केली.
मोहमद एहसान नजर मोहमद शहा (वय २०, रा. लेबर कॅम्प, केसनंद), अरशद रोशन आली (वय २२, रा. लेबर कॅम्प, केसनंद), अखिलेश बिजु प्रसाद कुमार (वय २०, रा. लेबर कॅम्प, केसनंद, मुळ रा. उत्तर प्रदेश), दिलीप सकु चव्हाण (वय ३६, रा. व्ही टी पी लेबर कॅम्प, वाघोली), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०, रा. जोगेश्वरी रोड, केसनंद) आणि अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७, रा. केसनंद, मुळ रा़ मानोरा, जि. वाशीम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार केसनंदमधील जोगेश्वरी विद्यालयात शनिवारी दुपारी दीड ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेसाठी जोगेश्वरी विद्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तिघे मजूर मतदान करुन बाहेर आले. तेव्हा बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांना हे इथले ग्रामस्थ दिसून येत नसल्याची शंका आली. तेव्हा त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी लेबर कॅम्पमध्ये रहात असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील आधार कार्ड पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले. या कार्यकर्त्यांनी त्यांनी तेथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मतदान करण्यासाठी रांगेत असलेल्यांची तपासणी केल्यावर आणखी तिघे जण आढळून आले. पोलिसांनी निवडणुक अधिकार्यांना विचारणा केल्यावर त्यांनी या मतदारांकडे आधार कार्ड होते. त्यांची नावे यादीशी जुळत असल्याने त्यांना मतदान करु देण्यात आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींनीही त्याला आक्षेप घेतला नाही, असे सांगून तक्रार देण्यास नकार दिला. पोलिसांनी या सहा जणांकडे चौकशी केल्यावर त्यांनी आम्हाला काही जणांनी येऊन पैसे देऊन आधार कार्ड देऊन मतदान करायला सांगितले होते. पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत.
