Pune Crime News | महिलेचा खुन करुन तिचा मृतदेह दरीत फेकून देणार्या रिक्षाचालकासह 6 जणांना गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने केली अटक
पुणे : Pune Crime News | रिक्षात बसलेल्या महिलेला आडमार्गाने मांगडेवाडी येथील डोंगरात घेऊन गेल्यानंतर तिने वाद घातल्यावर तिचा खुन करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने रिक्षाचालकासह ६ जणांना अटक केली आहे.
रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी (वय २०, रा. भारतनगर,कात्रज), त्याचे मित्र अब्दुल मोहमंद शेख (वय २३) आणि सोनू लक्ष्मण पवार (वय १९, दोघे रा. भारतनगर, रासकर पार्क, कात्रज), महादेव अर्जुन व्होरडे, साई अमित पुुजारी, सोहेल हनीफ खान अशी आरोपींची नावे आहेत.
मांगडेवाडी येथील डोंगराळ भागात असलेल्या क्रशन खाणीमध्ये १० फेब्रुवारी रोजी एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली होती.
भारती विद्यापीठ व गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांची दोन पथके तयार करुन तपास सुरु केला. डोंगराळ भाग असल्याने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. तसेच वैद्यकीय अहवालानुसार या महिलेचा मृतदेह घटनास्थळावर मिळून आल्याच्या किमान २४ तास आधी तिचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. महिलेच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा केल्यावर ही आत्महत्या नसल्याची खात्री पटली.
डोंगराळ भागापासून चारही बाजूला ३ किमी परिसरातील तसेच ही महिला राहत असलेल्या परिसरातील प्राप्त होतील तेवढे सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आले. त्यामध्ये ९७ महत्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करुन पाहणी करण्यात आली. त्यामध्ये संशयित ३५ वाहने निवडली गेली. त्यातील प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात आली. त्यात भारतनगर येथील रिक्षाचालक केशव चौधरी याचीही रिक्षा होती. त्याच्याकडे चौकशी केली असता फुटेजमध्ये दिसत असलेल्या त्याच्या रिक्षाचे हुडमध्ये त्याने जाणीवपूर्वक बदल केलेला दिसला. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला.
पोलिसांनी त्याच्याकडे आपल्या पद्धतीने चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर तो पोपटासारखा बोलायला लागला. ही महिला कोंढवा ते कात्रज अशी शेअरिंग रिक्षा समजून त्याच्या रिक्षाला हात दाखविला. त्यावेळी त्याच्या रिक्षामध्ये त्याचे नशेडी मित्र अब्दुल शेख व सोनु पवार हे होते. त्यांनी या महिलेला रिक्षामध्ये घेतले. तिने कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले. तिला शॉर्टकटचा बहाणा करुन मधल्या रस्त्याने मांगडेवाडी येथील डोंगरात घेऊन गेले.
त्या ठिकाणी महिलेने मला इकडून का आणले, असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. तेव्हा तिघांनी तिला मांगडेवाडी येथील खाणीतील दरीत फेकून देऊन तिचा खुन केल्याची कबुली दिली. या प्रकारामध्ये या तिघांबरोबरच त्यांचे मित्र महादेव व्होरडे, साई पुजारी, सोहेल खान यांचा सहभाग असल्याने त्यांना ही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील तपास कामी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस हवालदार विजय पवार, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, शंकर नेवसे, संतोष टकले, शंकर कुंभार, अजीम शेख, विनोद चव्हाण सद्दाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, ओंकार कुंभार, विशाल दळवी, ऋषिकेश व्यवहारे, संजय आबनावे, विनायक वगारे यांनी केली आहे.
