Pune Crime News | नीलेश घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर 6455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल; कोथरुडमधील घटनेचा गणेश विसर्जनाच्या दिवशी रचला होता कट
पुणे : Pune Crime News | कोथरुडमध्ये आपल्या टोळीची दहशत कमी झाली असून टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसात जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगून नीलेश घायवळ याने गणेशोत्सव विसर्जन दिवशी ६ सप्टेंबर २०२५ रोजी कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातूनच पुढे १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुठेश्वर मित्र मंडळा चौकाजवळ गप्पा मारत उभे असलेल्यांवर घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. या गुन्ह्याने पुणे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्का कारवाई केली आहे.
घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारावर गुन्हे शाखेने ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यामध्ये हा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे म्हटले आहे.
मयुर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), मयंक मॉन्टी विजय व्यास (वय २९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), गणेश सतिश राऊत (वय ३२, रा. गावडे चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरुड), दिनेश राम फाटक (वय २८, रा. माथवड चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन,कोथरुड), आनंद अनिल चांदलेकर (वय २४, रा. श्रीराम कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), मुसाब ईलाही शेख (वय ३३, रा. सिद्धीविनायक कॉलनी, कोथरुड), जयेश कृष्णा वाघ (वय ३६, रा. केळेवाडी, कोथरुड), अक्षय दिलीप गोगावळे (वय २९, रा. बाराटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), अजय महादेव सरोदे (वय ३२, रा. योगीराज बिल्डिंग, वृंदावन कॉलनी, आझादनगर, कोथरुड) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हा गुन्हा घडल्यानंतर काही दिवसात गँगस्टर नीलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. त्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आली आहे.
कोथरुड येथील मुठेश्वर मित्र मंडळ चौकाजवळ १७ सप्टेंबर २०२५ रोजी काही जण गप्पा मारत थांबले असताना घायवळ टोळीतील गुंड दोन मोटारसायकलवरुन तेथे आले. तेथे थांबलेल्यांना ‘‘तुम्हाला लय माज आला आहे का? कशाला थांबला आहे येथे, हा आमचा एरिया आहे, रोहित ठोक रे यांना मयºया खाली उतरुन बघ रे यांना आज यांची विकेटच टाकू’’ असे म्हणत त्यांनी धमकावून शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता मयुर कुंबरे याने त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर पिस्टलमधून गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये नीलेश घायवळ, मयुर कुंबरे व त्याचे इतर साथीदार यांनी ६ सप्टेंबर २०२५ रोजी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी या गुन्ह्याचा कट रचला होता. त्यावेळी नीलेश घायवळ इतर आरोपींना म्हणाला की, ‘‘कोथरुड भागात आपली दहशत कमी झालेली आहे. आपले टोळीचे वर्चस्व कोथरुडमध्ये वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसात जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो,’’ असे सांगितले होते. हा कट पूर्णत्वास नेण्यासाठी नीलेश घायवळ याने वेपन व आर्थिक सहाय्य देऊन हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी हा गुन्हा स्वत:चे व टोळीचे आर्थिक फायद्याकरता संघटितपणे केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपींवर २५ सप्टेंबर २०२५ रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले १ पिस्टल, १ रिकामी पुंगळी, नीलेश घायवळ याच्या घरझडतीमध्ये २ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात ९ जणांना अटक करण्यात आली असून ८ जण अजून फरार आहे. त्यांना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले आहे. नीलेश घायवळ याला अटक करण्याकरीता इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे.
नीलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरुड भागात २ बेकायदेशीर इमारती बांधल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पुणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या गुन्ह्यात १२२ साक्षीदार तपासले आहेत. तसेच ६ साक्षीदारांचे जबाब नोंद करण्यात आली आहे. अटक केलेल्या ९ आरोपीविरुद्ध १२ जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक माळेगाव, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, विशाल चव्हाण, पोलीस अंमलदार सुनिल राऊत, संतोष डोळस, नितीन काळे व उत्तेकर यांनी केली आहे.
