Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील 10 लाखांची रोकड असलेली बॅग भर दिवसा चोरट्याने पळविली; खडकी पोलिसांनी चार तासात आरोपींना केले मुद्देमालासह गजाआड

pune-police-arrest

पुणे : Pune Crime News | चाकणहून येऊन एका दुकानात देण्यासाठी पायी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने भर दिवसा सर्वांदेखत चोरुन नेली.

याबाबत अमीर युसुफ सय्यद (वय ६६, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खडकी बाजार येथील श्री महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर खडकी पोलिसांनी चार तासामध्ये दोघा आरोपींना पकडून त्यांच्याकडून लुटलेली १० लाखांची बॅग जप्त केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चाकण येथील एकाकडून १० लाख रुपये घेऊन पुण्यात आले होते. त्यांच्याकडे हॅडबॅग होती. खडकी बाजार येथे देण्यासाठी ते चालले होते. खडकी बाजार येथील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स समोर ते दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्यांनी त्यांना हाताला हिसका मारुन ती १० लाख रुपये असलेली बॅग हिसका मारुन चोरुन नेली.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदिपान पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी दोघा संशयितांना पकडले असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले तपास करीत आहेत.