Pune Crime News | स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने सराफाने सेवानिवृत्त महिलेला घातला 1 कोटी 34 लाखांचा गंडा, अनेक लोकांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय
पुणे : Pune Crime News | स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिलेला सराफाने १ कोटी ३४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत कात्रज येथे राहणार्या एका ६१ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हेमंत दत्तात्रय खरोटे Hemant Dattatreya Kharote (वय ४५), रुपाली हेमंत खरोटे Rupali Hemant Kharote (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) या सराफ पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रजमधील शिव शंभोनगर येथील बालाजी कृपा इमारतीत १२ ऑगस्ट २०२४ ते ७ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या नोकरी करत होत्या. त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. हेमंत खरोटे हा सराफ असून एका बँकेत सोने मुल्यांकनकार म्हणून काम करतात. हेमंत खरोटे याने फिर्यादी यांच्या पतीला सोन्यामध्ये पैसे गुंतवणुक करा. सोन्याचे प्रती तोळा दर कमी आहे. मेकिंग चार्जेस लागणार नाही व स्वस्तात सोने देतो असे सांगितले. सुरुवातीला त्याने १२५ ग्रॅम सोने देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांच्या व्हॉटसअपवर सोन्याचे दागिन्यांचे, सोन्याचे बिस्किटांचे फोटो पाठवून स्वस्तात सोने मिळवुन देतो, असे वेळोवेळी आश्वासन दिली. फिर्यादी या सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेले फंडाचे पैसे, पीएफमधील सर्व बचत असे सर्व पैसे एकत्र करुन त्यांनी वेळोवेळी खरोटे याला १ कोटी ४९ लाख ९५ हजार ५०० रुपये दिले. त्यापैकी त्याने ७ लाख २३ हजार रुपयांचे १२५ ग्रॅम सोने व ७ लाख ९० हजार रुपये परत केले. उर्वरित १ कोटी ३४ लाख ८२ हजार ५०० रुपये परत न करता फसवणूक केली आहे.
खरोटे हा एका बँकेत सोने मुल्यांकनकार म्हणून काम करत होता. तसेच त्याचे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यामुळे त्याने अजूनही काही जणांची फसवणूक केली असण्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.
