Pune Crime News | रस्त्यावरील लोंबकणार्या केबलने घेतला बळी ! बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने खाली पडून क्लिनरचा मृत्यु, गणेशखिंड रोडवरील पहाटेची घटना

पुणे : Pune Crime News | रस्त्यावर लोंबकणार्या केबल हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. अशाच एका लोंबकणार्या केबलमुळे एका क्लिनरचा मृत्यु झाला. ही घटना गणेशखिंड रोडवरील वैकुंठ मेहता सहकारी प्रबंध संस्थान कमानीजवळ शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजता घडला. (Pune Accident News)
संकेत देवीदास चैलवाल (वय २९, रा. मासोद, ता. अमरावती) असे या क्लिनरचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार विकास परसराम इंगळे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बसचालक बबलू हमिदमिया मकतेवाल (वय ३३, रा. हुडगी, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस हे मध्यरात्री १२ वाजता मुंबईहून निघून पुण्यात पहाटे ४ वाजता आली होती. पहाटे सव्वाचार वाजता वैकुंठ मेहता सहकारी प्रबंध संस्थान येथील कमानीजवळ वायरचा बसला अडथळा येत होता. त्यामुळे क्लिनर संकेत चैलवाल वायर बाजूला करण्यासाठी ट्रॅव्हल्स बसच्या टपावर चढला. त्याने वायर बाजूला केल्यावर बस कमानीतून पुढे आली. बस मेन रोडला आल्यानंतर बसचालकाने भरधाव वेगाने बस पुढे घेतली. अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसवर चढलेला संकेत चैलवाल हा बसवरुन खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करीत आहेत.
रस्त्यावर लोंबकणार्या केबलमुळे क्लिनर बसच्या टपावर चढला होता. शहरात जागोजागी बेकायदेशीरपणे केबल खांबाखांबावर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होण्याबरोबरच तो एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो, याची जाणीव असतानाही त्याविरोधात कारवाई करण्यास महापालिका कुचराई करते.