Pune Crime News | बुलेटला फटाके वाजणारे सायलेन्सर लावून दुचाकींशी स्पर्धा लावणार्या तरुणांवर गुन्हा दाखल, बुलेट जप्त करुन करणार कारवाई
पुणे : Pune Crime News | नेहमी वाहनांची गजबजलेल्या ६० फुटी रोडवर रॉयल इनफिल्ड बुलेटला फटाके वाजणारे सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात स्पर्धा लावून वेगाने जाऊन लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या तरुणांना काळे पडळ पोलिसांनी पकडले.
याबाबत पोलीस हवालदार श्रीकृष्ण उत्तमराव खोकले यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मयुर संजय तुपे Mayur Sanjay Tupe (वय २७, रा. माळवाडी, हडपसर), यश संतोष भोसले Yash Santosh Bhosale (वय २३, रा. होळकरवाडी, खोटेनगर) आणि तुकाराम अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महंमदवाडी येथील पाटील कट्टा समोरील रोडवर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता घडला.
रॉयल इनफिल्ड बुलेटला मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून वेगाने गाड्या चालवून रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण करतात. असे आवाज करणारे सायलन्सर लावलेल्या गाड्या ताब्यात घेऊन वाहतूक पोलिसांनी काही हजार सायलेन्सर वेळोवेळी तोडून टाकले आहेत.
महंमदवाडी येथील ६० फुटी रस्ता नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो. अशा रस्त्यावर रविवार दुपारी तिघांनी बुलेटला फटाके वाजणारे सायलेन्सर लावून मोठमोठ्याने आवाज करत एकमेकांच्या दुचाकीशी स्पर्धा लावून वेगाने जात होते. काळेपडळ पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यातील दोघांना पकडले. त्यांच्या गाडीची कागदपत्रे तपासली असता ते विना लायसन्सचे गाडी चालवून स्वत:चे व दुसर्याच्या जिविताची काळजी न घेता भरधाव जात होते. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यांना नोटीस देण्यात आली असून त्यांची बुलेट जप्त करण्यात येऊन प्रादेशिक वाहन विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी सांगितले.
