Pune Crime News | ‘चोर आ रहा है, स्कॅमर आ रहा है’ म्हणणार्‍यांना जाब विचारल्याने टोळक्याने दुकानात शिरुन केली तोडफोड, 5 जणांवर गुन्हा दाखल

Marhan Web

पुणे : Pune Crime News | तरुण आपल्या वडिलांच्या दुकानात जात असताना समोरील दुकानातील एकाने ‘‘चोर आ रहा है, स्कॅमर आ रहा है’’ असे म्हटले. त्याचा जाब तरुणाच्या वडिलांनी विचारल्यावर टोळक्याने दुकानात शिरुन तोडफोड केली. खडक पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मोहम्मद रियाज हारुन शेख (वय २५, रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रईस कुरेशी (वय ४०), सुफियान कुरेशी (वय २५), वाहिद कुरेशी, अबु कुरेशी, इलियास कुरेशी (सर्व रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार काशीवाडी येथील चमनशहा दर्गा रोडलगत महाराष्ट्र पान शॉपमध्ये २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद शेख हे पुणे महापालिकेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी करतात. त्यांचे महाराष्ट्र पान शॉप हे दुकान आहे. ते दुकान त्यांचे आई व वडिल हारुन शेख सांभाळतात. त्यांच्या दुकानासमोर रईस कुरेशी याचे भंगाराचे दुकान आहे. फिर्यादी हे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या गाडीवरुन जात असताना रईस कुरेशी हा त्यांना पाहून शिवीगाळ करीत होता. ‘‘चोर आ रहा है, स्कॅमर आ रहा है’’ असे बोलत होता. तेव्हा हा प्रकार त्यांनी दुकानात येऊन वडिलांना सांगितला. त्यांचे वडिल हारुन शेख यांनी रईस कुरेशी याला विचारले की‘‘मेरे बच्चे को क्यो गालीया दे रहा है,’’ त्यावर त्यांचे काही न ऐकता रईस त्यांच्या दुकानात शिरुन फिर्यादी यांची गचंडी पकडली. शिवीगाळ करु लागले. बरण्या फेकू लागले. त्यावेळी रईसचा भाऊ अबु कुरेशी तेथे आला. त्याने त्यांच्या दुकानातील बरणी भिरकावून दिली. त्यावेळी तेथे इलियास कुरेशी, सुफियान कुरेशी, वाहिद कुरेशी हे तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. वाहिद कुरेशी याने तेथे पडलेला दगडाने दुकानाची तोडफोड केली व तुझे बहोत मस्ती आई है असे म्हणत तेथे पडलेल्या लाकडी बांबुने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात जोरात मारुन त्यांना जखमी केले. इलियास याने लाथाबुक्क्यांनी वडिलांना मारहाण करुन दुकानातील काचेच्या बरण्यांची तोडफोड केली. दोघांना मारहाण करुन सर्व जण पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत.

You may have missed