Pune Crime News | भोसरीतील तरुणाला महाबळेश्वरला फिरायला घेऊन जाऊन ताम्हिणी घाटात खुन; मृतदेह टाकून देणार्या दोघा मित्रांना अटक, इलेक्ट्रॉनिक घड्याळाने पटविली ओळख
पुणे : Pune Crime News | भोसरीतील इंद्राणी नगरमध्ये राहणार्या मित्राला त्याच्या कारमधून महाबळेश्वरला फिरायला जाऊ असे सांगून वाटेत ताम्हिणी घाटात गळा आवळून कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह घाटात टाकून पुण्यात येऊन त्याची कार विक्री करण्याचा प्रयत्न करणार्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली.
अनिकेत महेश वाघमारे Aniket Mahesh Waghmare (वय २६, रा. रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द) आणि तुषार ऊर्फ सोन्या शरद पाटोळे Tushar alias Sonya Sharad Patole (वय २४, रा. सुशिल गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रज्वल ऊर्फ सोन्या संतोष हंबीर Prajwal alias Sonya Santosh Hambir (रा. वारजे माळवाडी) याचा शोध घेण्यात येत आहे. अनिकेत वाघमारे याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये मारहाण करुन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच २०२४ मध्ये गर्दी, दंगल माजवून मारहाण केल्याचा असे दोन गुन्हे दाखल आहेत.
आदित्य गणेश भगत (वय २२,रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी, मुळ रा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बाणेर आणि माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावाच्या हद्दीतून सिक्रेट पॉईंट कडे जाणार्या रोडच्या उजव्या बाजूला कोयत्याने गळ्यावर, डोक्यावर व हातावर वार करुन एका तरुणाचा खुन करण्यात आला होता. जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी जागा पाहण्यासाठी आलेल्यांना ११ जानेवारी रोजी हा मृतदेह पडलेला आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्याचवेळी त्याच्या हातातील इलेक्ट्रॉनिक घड्याळाकडे पोलिसांचे लक्ष गेले. या घड्याळाच्या सहाय्याने माणगाव पोलिसांनी काही तासात खुन झालेल्या आदित्य भगत व आरोपींची नावे निष्पन्न केली.
अनिकेत वाघमारे, तुषार पाटोळे व प्रज्वल हंबीर हे आदित्य भगत याच्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून महाबळेश्वर येथे फिरायला चालले होते. ताम्हिणी घाटामध्ये आल्यावर त्यांच्यात पैशाच्या कारणावरुन वाद झाला. तिघांनी आदित्य भगत याचा दोरीने गळा आवळून खुन केला. त्याच्यावर कोयत्याने डोक्यात, गळ्यावर,हातावर वार करुन त्याचा मृतदेह सणसवाडी गावाच्या हद्दीत टाकून ते पुण्याला परत आले. याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांनी माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, नरेंद्र बेलदार, पोलीस हवालदार तडताळे, घोडके, वर्तक, लहाने, पोलीस अंमलदार कांबळे, पठाण, तांदळे, त्रिभुवन, लांडे यांनी गुन्ह्याचा तपास केला आहे.
बाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रितम निकाळजे यांना ११ जानेवारी २०२६ रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण चोरीची कार विक्री करण्याच्या प्रयत्नात असून तो कार घेऊन ननावरे पुलाजवळ थांबला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. गाडीजवळ एक जण आला. त्याने कारचा दरवाजा उघडून आत बसत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव अनिकेत वाघमारे असल्याचे सांगितले. त्याच्याकडील कारबाबत चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. बाणेर पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केल्यावर त्याने व इतर तीन साथीदारांनी आदित्य भगत याचा खुन करुन त्याची गाडी घेऊन पुण्यात आलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी तुषार पाटोळे आणि ओमकार केंबळे (रा. पर्वती) याची नावे सांगितले. ओमकार केंबळे याचा या घटनेशी संबंध नसल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले. त्याच्याशी दुष्मनी असल्याने अनिकेत वाघमारे याने त्याचे नाव यात गोवण्याचा प्रयत्न केला. या दोघांना माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार व त्यांच्या सहकार्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चुलुमुला, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहे आहेर, किसनशिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, रोहीत पाथरुट, स्वप्निल मराठे यांनी केली आहे.
