Pune Crime News | मेट्रीमोनी साईटवरुन लग्नाचे आमष दाखवून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तरुणाची 42 लाख रुपयांची फसवणूक; वडिल, बहिणीसह तरुणीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News । भारत मेट्रीमोनी जीवनसाथी या संकेतस्थळावरुन तरुणाची ओळख करुन घेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वडिल व बहिणीच्या मदतीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तरुणाला लुबाडून ४२ लाख ८७ हजार ९६५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत नवी मुंबईतील एका ४३ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नागपूरच्या ३५ वर्षाच्या तरुणीबरोबरच तिचे वडिल (वय ६५) आणि बहिण (वय ३८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रज येथील ग्रीनवुड सोसायटी तसेच नागपूर मधील विविध ठिकाणी ३० ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणीने भारत मेट्रीमोनी जीवनसाथी या संकेतस्थळावरुन फिर्यादीशी ओळख करुन त्यांचा विश्वास संपादन केला. या तरुणीने त्यांच्याशी लग्नाचा बहाणा करुन तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. फिर्यादी यांच्याशी स्वसमंतीने शरीर संबंध ठेवून त्याचा गैरफायदा घेऊन या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरीक संबंध केले आहेत, अशी पोलिसांकडे लैंगिक अत्याचाराची केस करण्याची धमकी दिली. ही तरुणी व तिचे वडिल यांनी फिर्यादी यांना आयुष्यभर जेलमध्ये सडविण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला. त्यांच्याकडून खंडणी स्वरुपात तरुणीच्या वडिलांनी विविध बँका व पतसंस्थेचे असलेले कर्ज फेडण्यासाठी धमकावुन पैसे घेतले.
या तरुणीच्या बहिणीने सोने गहाण कर्ज बळजबरीने फेडण्यासाठी व इतर चीज वस्तुंसाठी तसेच शौक, चैनीसाठी या तरुणाला धमकावुन पैसे घेतले. फिर्यादी यांच्याकडून एकूण ४२ लाख ८७ हजार ९६५ रुपये घेतले होते. फिर्यादी यांनी ही तरुणी, तिचे वडिल व बहिण यांना पैसे व इतर चीजवस्तु देण्याचे बंद केले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्यावर लैंगिक अत्याचाराची केस करण्याची धमकी दिली. फिर्यादीला त्रास न देण्याकरीता आणख ७ लाख रुपयांची मागणी करुन आर्थिक पिळवणुक केली. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करीत आहेत.
