Pune Crime News | माणगाव खुन प्रकरणातील आरोपी स्वत:च्याच घरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
पुणे : Pune Crime News | मित्राला फिरायला घेऊन जाऊन त्याचा ताम्हिणी घाटात खुन करुन पुण्यात पळून आलेल्या आरोपींना बाणेर पोलिसांनी पकडून माणगाव पोलिसांच्या हवाली केले होते. त्यातील एका आरोपीला पुण्यातील घरात तपासासाठी आणले असता त्याने माणगाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याच्याच घरातून तो पळून गेला.
अनिकेत महेश वाघमारे Aniket Mahesh Waghmare (वय २६, रा. लक्ष्मी विहा अपार्टमेंट, रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता ) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले (वय २९) यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्याच्या घरात घडला.
भोसरीतील तरुणाचा महाबळेश्वरला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्रांनीच ताम्हिणी घाटात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आदित्य गणेश भगत (वय २२, रा. साई रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. चोबे पिंपरी, ता. माढा, जि. सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत महेश वाघमारे, तुषार ऊर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) यांना अटक करण्यात आली होती.
या खुन प्रकरणातील आरोपीची घरझडती घेण्यासाठी माणगाव पोलीस अनिकेत वाघमारे याला घेऊन त्यांच्या सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथील लक्ष्मी विहार अपार्टमेंटमधील घरी आले होते. पोलिसांनी त्याच्या घरातून मोबाईल जप्त केला. त्याच्या घरात पोलीस पंचनामा करीत असताना त्याच्या घरातच तो शांतपणे बसला होता. त्यावेळी पंचनामा करणारे पोलीस गाफील असल्याचे पाहून अनिकेत वाघमारे हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. पोलिसांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.
