Pune Crime News | येरवडा जेलमध्ये फरशी डोक्यात घालून गंभीर जखमी केलेल्या आरोपीचा ससून रुग्णालयात मृत्यु; मानसिक त्रास देत असल्याने डोक्यात फरशी घालून केले होते गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये वादातून डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केलेल्या आरोपीचा ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी मृत्यु झाला.
विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्यु पावलेल्या आरोपीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, लक्ष्मीनगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्यावर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना येरवडा पोलीस ताब्यात घेणार आहेत. येरवडा कारागृहातल बॅरेक १ मध्ये १५ डिसेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता ही घटना घडली होती.
विशाल कांबळे हा संदीप सुभाष देवकर (वय ४९, रा. नवी खडकी, येरवडा) याचा खुन केल्याच्या आरोपातून येरवडा कारागृहात आहे. हातगाडी लावण्याच्या वादातून विशाल कांबळे व इतरांनी ५ जानेवारी २०१९ रोजी रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करुन संदीप देवकर याचा खुन केला. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात असून त्याचा अजून जामीन झाला नव्हता. त्यात आता त्याचा मृत्यु झाला आहे.
आकाश चंडालिया याने साथीदारांसह विकी चंडालिया याच्यावर अग्रेसन स्कुल समोर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना १९ एप्रिल २०२४ रोजी रात्री एकच्या सुमारास घउली होती. याप्रकरणात आकाश चंडालिया हा तेव्हापासून येरवडा कारागृहात न्यायलयीन कोठडीत आहे.
हे तिघेही जण न्यायालयीन कोठडीत होते. तिघांना एकाच बॅरेकमध्ये ठेवले होते. १५ डिसेंबर रोजी सर्व आवरुन विशाल कांबळे हा दरवाज्याजवळ झोपला होता़. तेव्हा आकाश चंडालिया याने दीपक रेड्डी याला फरशीचा तुकडा आणायला सांगितला. रेड्डी याने भिंतीलगतची फरशी उकरुन त्याचा तुकडा लपवून आणून आकाश याला दिला. आकाश याने झोपलेल्या विशालच्या डोक्यात व कमरेवर दगडी फरशीने घाव घातले. त्याचा आरडाओरडा ऐकून सुरक्षा रक्षक धावत गेले. त्यांनी जखमी अवस्थेत विशाल याला कारागृहातील रुग्णालयात नेले. परंतु, तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना शुक्रवारी त्याचा मृत्यु झाला.
याबाबत आकाश चंडालिया याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने विशाल गेल्या दोन महिन्यांपासून मानसिक त्रास देत होता़ चिडत होता, त्या रागातून त्याला मारल्याचे आकाश चंडालिया याने पोलिसांना सांगितले़ सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड तपास करीत आहेत.
