Pune Crime News | किरकटवाडीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 1 वर्षासाठी केले चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | हवेलीतील किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सुरज महेंद्र नांगरे Suraj Mahendra Nagre (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
सुरज नांगरे याच्याविरुद्ध २०२३ पासून खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, दहशत पसरविणे असे ४ गुन्हे दाखल आहेत. लोकांमध्ये त्याची दहशत असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करायला कोणी पुढे येत नाही. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काही एक परिणाम झाला नाही.
नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन सुरज नांगरे याला चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
गेल्या ३ महिन्यांपासून सुरज नांगरे हा फरार होता. त्यास इंस्टाग्राम, फेसबुक याच्या सहाय्याने मुंबई, सातारा व पुणे ग्रामीण परिसरात शोध घेण्यात आला. पोलीस हवालदार संग्राम शिनगारे, स्वप्निल मगर, निलेश खांबे, प्रतिक मोरे यांनी त्याला भोर येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर एमपीडीए कायद्याचा आदेश बजावून त्यांची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारुड यांनी केली आहे.
