Pune Crime News | मागून येऊन मर्सिडीज कारला धडक दिल्यानंतर त्यांच्याकडे नुकसान भरपाई मागून मारहाण करण्याचा प्रकार; वाघोली पोलिसांनी चौघांवर केला गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | पुणे – अहिल्यानगर रोडवर मागून आलेल्या स्विफ्ट कारने पुढील मर्सिडीज कारला पाठीमागून जोरात धडक दिली. आपली चुक असतानाही मर्सिडीज कारचालकाकडे नुकसान भरपाई मागून त्या कारमधील लोकांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विनोद सदाशिव कानडे (वय ३२, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांनी वाघोली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदेश बाळासाहेब लोहोट (वय ३२, रा. कल्पतरु बिल्डिंग, चंदननगर), भरत हरी पोळ (वय १९, रा. भारतमाता चौक, चिखली) वैष्णवी रेश्मा मुसळे (वय २२, रा. चंदननगर) आणि आरती शिंदे (वय २३, रा. केसनंद) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे – अहिल्यानगर रोडवर वाघोलीतील एच पी पेट्रोलपंपाजवळ रविवारी २० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद कानडे हे १२ वर्षाच्या मुलाला घेऊन घरी जात होते. त्यावेळी मागून आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या गाडीला मागून जोरात धडक दिली. त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. आरोपींनी खाली उतरुन कानडे यांच्याकडे गाडीला झालेले नुकसान भरुन देण्याची मागणी करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कारची काच फोडली. यामुळे हा मुलगा रडायला लागला. स्विफ्ट कारमधील लोकांनी आणखी काही जणांना बोलावून घेतले. तसेच मर्सिडिज कारमालकाला बोलावून घेतले. स्विफ्ट कारने सुरक्षित अंतर न ठेवता मागून येऊन जोरात धडक दिली असतानाही त्यांची चुक असतानाही मर्सिडीज कारचालकाकडे नुकसान भरपाई मागू लागले. अरविंद व्यंकटेश् कोथापल्ली, त्यांची पत्नी वर्षा कोथापल्ली, तसेच नातेवाईक विशाल वर्मा व अनुराग वर्मा यांना त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांची सुटका केली.
सुरक्षित अंतर न ठेवता पाठीमागून येऊन धडक दिल्यानंतर व मारहाण करुन नुकसान भरपाई मागणार्या मागील कारचालक व त्यातील लोकांवर गुन्हा दाखल केला असल्याचे वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितले.