Pune Crime News | शेअर मार्केटमधील फसवणुकीनंतर आता फॉरेन करंन्सीमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक; सायबर चोरट्यांचा नवा फंडा, अकाऊंटंटला गंडा

fraud

पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींचा सायबर चोरटे गंडा घालत असताना आता फसवणुकीचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी काढल्याचा समोर आले आहे. त्यात सायबर चोरट्याने एका अकाऊंटंलाच गंडा घातला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत कोंढव्यात राहणार्‍या एका ३९ वर्षाच्या अकाऊंटंटने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फॉरेन करंन्सीमध्ये ट्रेडिंग करुन जास्तीचा लाभ कसा होईल, हे ते शोधत होते. त्यावेळी त्यांना टेलिग्रामवर अमित ट्रेडर/ ट्रेडिंग नावाची वेबसाईट दिसली. त्यांनी संपर्क साधल्यावर वेगवेगळ्या देशातील करंन्सी खरेदी विक्री करण्याबाबत माहिती दिली. ही खरेदी विक्री qx क्यु एक्स ब्रोकर या अ‍ॅपद्वारे आम्ही सांगले त्यावेळी करायची, असे सांगितले गेले. त्यांना सुरुवातीला एका लिंकवर डेमो अकाऊंट वापरण्यास दिले. त्यावर रक्कम गुंतवल्यास २ ते ३ मिनिटांचा वेळ मिळत असे. त्यावेळेत तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या देशांची करंन्सी खरेदी करावी लागत असे. ते घड्याळामध्ये २ ते ३ मिनिटांचा वेळ सेट करुन ते सांगतील, त्या देशांची करंन्सी खरेदी किंवा विक्री करत असे. वेळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खरेदी किंवा विक्री केलेल्या करंन्सीमध्ये किती नफा/नुकसान झाले आहे, ते दिसत असे. (Online Cheating Case)

या डेमो नंतर त्यांना काही रक्कम गुंतविण्यास सांगितली़ त्यासाठी त्यांच्या क्यु एक्स या अ‍ॅपच्या क्युआर कोडवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यांनी २७ हजार ३०० रुपये पाठविले. परंतु, ही रक्कम क्यु एक्स अ‍ॅपवर दिसून आली नाही. त्यांनी टेलिग्राम मेसेजद्वारे त्यांनी पाठविलेल्या पैशांबाबत विचारणा केली. त्यावर त्यांना आमच्यावर विश्वास ठेवा तुमचे पैसे कोठेही जाणार नाही, सर्व पैसे मोबदल्यासहित परत मिळतील, असे मेसेजद्वारे सांगितले. त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर क्राईम ऑनलाईन पोर्टलवर या प्रकरणाची तक्रार नोंदविली. या तक्रारीनंतर त्यांनी पाठविलेली रक्कम फ्रिज करण्यात आली आहे. पहिल्यादा पैसे पाठविल्यावरच आपली फसवणुक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर त्यांनी तातडीने तक्रार नोंदविल्याने ते पैसेही चोरट्यांनी काढण्यापूर्वीच फ्रिज केले गेल्याने त्यांचे नुकसान टाळले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.

You may have missed