Pune Crime News | पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस; तहसीलदार, दिग्विजय पाटीलसह 9 जणांवर गुन्हा दाखल

Parth pawar

पुणे : मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंगज कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कृषी खात्याकडे बोपोडी येथील ५ हेक्टर जमीनीचा ताबा असताना तहसीलदाराला हाताशी धरुन जमिनीचा अपहार करुन बेकायदेशीर आदेश व पत्र तयार करुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ४१ मिनिटांनी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे (वय ५०) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तहसीलदार सूर्यकांत येवले, व्हिजन प्रॉपर्टी तर्फे कुलमुखत्यार धारक राजेंद्र रामचंद्र विध्वंस (रा. इंद्रा मेमरीज, सकाळनगर, बाणेर रोड), रुषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. नवीन फ्लासिया इंदोर, मध्यप्रदेश),जयश्री संजय एकबोटे (रा़ चित्रलेखा बिल्डिंग, कुलाबा, मुंबई), कुलमुखत्यार धारक शितल किसनचंद तेजवाणी आणि अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीचे संचालक दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार खडकमाळ येथील मामलेदार कचेरीत १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नायब तहसीलदार म्हणून उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी सरकारतर्फे प्रधिकृत अधिकारी म्हणून तक्रार दिली आहे. सूर्यकांत येवले तहसीलदार म्हणून पुणे शहर मामलेदार कचेरी येथे कार्यरत असताना १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या दरम्यान आपले अधिकारपदाचा गैरवापर करुन शहरामध्ये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चा महानगर पालिका क्षेत्रात लागू नसतानाही बोपोडी येथील एकूण ५हेक्टर ३५ आर ही जमीन १८८३ पासून कृषि विभागाकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. तसेच या जमिनीचे मालक व कब्जेदार हे कृषि विभागाचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेले असताना या जमिनीचा अपहार करुन या जमिनीवर व्हिजन प्रॉपर्टीतर्फे अर्जदार हेमंत गवंडे व त्यांचे वतीने राजेंद्र विध्वंस, रुषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस तसेच विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शितल तेजवाणी, दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्याशी हातमिळवणी व संगनमत करुन सरकारी मिळकतीवर या व्यक्तींचा मालकी हक्क दिसून येत आहे, असा बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करुन शासनाची फसवणुक केलेले आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

You may have missed