Pune Crime News | कर्वेनगरमधील चंद्रलोक बारमध्ये तोडफोड करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात  फरार गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

Pune Crime News | Anti-Extortion Squad arrests fugitive gangster in case of attempted murder by vandalizing Chandralok Bar in Karvenagar

पुणे : Pune Crime News |  वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामधील टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून गेली सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले.

अथर्व लक्ष्मीकांत राजमाने Atharva Laxmikant Rajmane (वय २३, रा. कसबा पेठ, सध्या रा. विघ्नहर्ता पार्क, धायरी) असे या गुंडाचे नाव आहे.

याबाबत नितीन रुपचंद जमादार (वय २८, रा. वडगाव बुद्रुक) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कर्वेनगर येथील चंद्रलोक बियर बार गार्डन येथे २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी जमादार, प्रतिक भोकरे, रोहित रहाटे व त्यांचे मित्र दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावर शुभम उफाळे याचे विरोधक रवी जाधव, यश घोलप व त्याच्या १४ ते १५ साथीदारांनी कोयता, अ‍ॅल्युमिनियम पाईप व पेव्हिंग ब्लॉकने मारहाण केली. हॉटेलमध्ये तोडफोड करुन दहशत माजविली. या मारहाणीत प्रतिक भोकरे, रोहित रहाटे हे मारहाणीमुळे बेशुद्ध पडले होते. वारजे माळवाडी पोलिसांनी रवी जाधवसह १५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हपासून अथर्व राजमाने हा फरारी होता. त्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती.

खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार रहिम शेख, अमोल आवाड व मयुर भोकरे यांना माहिती मिळाली की, वारजे माळवाडी येथील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अथर्व राजमाने हा धायरीतील विघ्नहर्ता पार्क येथे आपली ओळख लपवून रहात आहे. ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळवून पोलीस पथकाने अथर्व राजमाने याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त शितल जानवे यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार रहिम शेख, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, मयुर भोकरे, सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, बालारफी शेख, नितीन बोराटे, सचिन माळवे, दयानंद तेलंगे, गितांजली जांभुळकर यांनी केली आहे.

You may have missed