Pune Crime News | खंडणी विरोधी पथकाने दोघा सराईतांना पकडून त्यांच्याकडून जप्त केले गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे
पुणे : Pune Crime News | खंडणी विरोधी पथकाने वाघोली परिसरात दोघा सराईतांना पकडून त्यांच्याकडून गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई गुरुवारी पहाटे बी जे एस कॉलेज फाटा येथे करण्यात आली.
तौसिफ शहा (वय २१, रा. नेहरुनगर, पिंपरी) आणि सोमा चौधरी (वय २१, रा. नेहरुनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस हवालदार कुसाळकर, पोलीस हवालदार घावटे, परीट, आढारी, येडे, पोलीस अंमलदार खरात हे वाघोली परिसरात रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार कुसाळकर व पोलीस अंमलदार गणेश खरात यांना बातमीदाराने माहिती दिली की, दोघे जण शस्त्रासह बी जे एस कॉलेज फाटा येथे थांबले आहेत. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक तेथे पोहचले. तेव्हा तेथे दोघे जण थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यातील तौसिफ शहा याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल व त्यात २ जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
