Pune Crime News | खंडणी विरोधी पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांकडून पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करुन विरोधी गटातील खुनाचा कट उधळला, 6 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | गुलटेकडी येथे झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पिस्तुल बाळगणार्या टोळीतील दोघा सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
प्रकाश तुळशीराम पवार Prakash Tulshiram Pawar (वय २४, रा. कॅनॉलजवळ वैदवाडी, हडपसर) आणि मुस्ताक इकराईम शेख Mustaq Ikraim Shaikh (वय २२, रा. आशरफनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमित शेखापुरे (रा. काकडे वस्ती, कोंढवा), जम्बा ऊर्फ अन्वर शेख, ओंकार पवार, निखिल लगाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अमित शेखापुरे याचा गुलटेकडी येथील विरोधी गटाबरोबर पूर्वीपासून वैमनस्य आहे. विरोधी गटाचा सुड घेण्याकरीता व त्यांच्यातील एकाची हत्या करण्यासाठी हे पिस्तुल आणले होते. या टोळीने विरोधी गटाचा खुन करण्याचा कट रचला होता. त्यापूर्वीच खंडणी विरोधी पथकाने कारवाई करुन हे पिस्तुल जप्त केले आहे. ही घटना कोंढव्यातील काकडे वस्तीतील मनपा क्रीडांगणात १३ मार्च रोजी रात्री ९ वाजता घडली. प्रकाश पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलीस अंमलदार आझाद रमेश पाटील यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, दिलीप गोरे, अमोल राऊत, पोलीस अंमलदार आझाद पाटील, पवन भोसले हे कोंढवा परिसरात गस्त घालत होते. यावेळी आझाद पाटील यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, रेकॉर्डवरील आरोपी प्रकाश पवार हा महापालिका क्रीडांगणाजवळील कबुतरांच्या ढाबळीसमोरील बाकड्यावर बसला असून त्याच्याकडे शस्त्र आहे. या माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी सापळा लावला. बाकड्यावर बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले. प्रकाश पवारबरोबर असलेल्या मुस्ताक शेख याच्या पॅन्टचे मागील बाजूस खोचलेले गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले.
मुस्ताक शेख याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हे पिस्टल प्रकाश पवार याने ठेवायला दिल्याचे सांगितले. प्रकाश पवार याने सांगितले की, अमित शेखापुरे याने २ पिस्टल कोठून तरी विकत आणले होते. त्यापैकी एक माझ्याकडे ठेवायला दिले आहे. अधिक चौकशीत त्याने सांगितले की, अमित शेखापुरे याचा गुलटेकडी येथील विरोधी गटाबरोबर पूर्वीपासून वैमनस्य आहे. विरोधी गटाचा सुड घेण्याकरीता व त्यांच्यातील एकाची हत्या करण्यासाठी आणले होते, असे सांगितले. तसेच प्रकाश पवार याने सांगितले की, तो स्वत: व अमित शेखापूरे, जम्बा ऊर्फ अन्वर शेख, ओंकार पवार, निखील लगाडे असे सर्वांनी मिळुन विरोधी गटाचा खुन करण्याचा कट रचला होता. हा खुन करण्यासाठी मुस्ताक शेख व अमित शेखापुरे यांच्याकडे असलेले गावठी पिस्टल वापरणार होतो. पोलिसांनी त्या अगोदरच एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करुन खुनाचा कट उधळला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार अधिक तपास करीत आहेत.
