Pune Crime News | बनावट दस्ताऐवजाबरोबरच बनावट स्टॅम्पपेपरचा वापर करुन महिलेच्या बालेवाडी येथील जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न; बाणेर पोलिसांनी 9 जणांवर दाखल केला फसवणूकीचा गुन्हा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  बनावट स्टॅम्पपेपरवर बनावट दस्ताऐवज तयार करुन बालेवाडी येथील जागेची एकाचवेळी अनेकांना  बनावट पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देऊन वृद्ध महिलेची जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

श्रेयश मनुभाई दोशी Shreyash Manubhai Doshi (वय ६४), अनिता श्रेयश दोशी Anita Shreyash Doshi (वय ६०, दोघे रा. जे जे चेबर्स, येरवडा), बृजकिशोर रामप्रसाद Brijkishore Ramprasad (वय ४७, रा. गीता अपार्टमेंट, सेक्टर १७, नवी मुंबई), किरण बाळासाहेब मगर Kiran Balasaheb Magar (वय ३६, रा. धोरोशी, ता. पाटण, जि. सातारा), अ‍ॅड. जयराज डोके, यश कालीदास कलाटे Yash Kalidas Kalate (रा. वाकड), अमित अग्रवाल, राजेश राजरत्न (रा. वडगाव शेरी), महेश वाघमोडे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बनावट पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी खरी असल्याचे भासविण्यासाठी श्रेयश दोशी याने रुपी बँकेचे बनावट बँक स्टेटमेंट सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मृदुला सुधीर थोरात (वय ७६, रा. आयडियल कॉलनी, पौड रोड) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ नोव्हेबर २०२५ ते ३ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी १९९९ मध्ये बालेवाडी येथील अंदाजे ४९८ चौरस मीटर जागा सुंदीप वासुदेव मीरानी यांच्या जनरल पॉवर ऑफ अटर्नीमार्फत खरेदी खत करुन खरेदी केली होती. तेव्हापासून ही मिळकत फिर्यादी यांच्या नावाने आहे. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमित अग्रवाल (रा. आयडीयल कॉलनी, कोथरुड) याने या जागेवर अतिक्रमण करुन फिर्यादी यांच्या नावाचा फलक काढून टाकून त्यावर स्वत:चे नाव लिहिले. क्रेनच्या सहाय्याने एक सिक्युरिटी केबिन बेकायदेशीरपणे फिर्यादी यांच्या जागेत अतिक्रमण केले. त्यांच्याकडील पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी पाहिली असताना हनुमंत ज्ञानू सपताळे (रा. संजयनगर, माळेवाडी, अकलुज, सोलापूर) यांनी करुन दिल्याचे सांगितले.

ती पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ही ४ नोव्हेबर १९९९ नुसार फिर्यादी यांच्याकडून करुन घेतली असल्याचे सांगितले. ती बनावट असल्याचे दिसून आले. फिर्यादी यांनी कोणालाही कधीही पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिलेली नाही. श्रेयश दोशी याने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी केल्याचे असल्याबाबत खोटे दस्तऐवज तयार करुन ही मिळकत त्यांच्या पत्नी अनिता दोशी याच्या नावाने बनावट कागदपत्रांचे आधारे करुन दिली. तसेच त्याची महसुल कार्यालयात नोंद करण्यास बनावट कागदपत्र सादर केली. त्यांना बनावट कागदपत्र तयार करण्यास बृजकिशोर रामप्रसाद आणि किरण बाळासाहेब मगर यांनी साक्षीदार म्हणून मदत केली. ही बनावट कागदपत्र अ‍ॅड. जयराज डोके यांनी तयार केली आहेत. तसेच फिर्यादी यांच्या जागेवर यश कलाटे व राजेश राजरत्न, महेश वाघमोडे व त्यांच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्या जागेवर येऊन दमदाटी करुन धमकावुन अतिक्रमण करुन जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

दोशी याने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करुन त्यावर फिर्यादीच्या बनावट सह्या केल्या. त्याने हा दस्तऐवज पहिल्यांदा अमित अग्रवाल याच्या नावाने व दुसर्‍यादा  अनिता  दोशी याच्या नावाने एक मास्टर कॉपीवरुन विविध फसवणुकदारांना नावे बदलून दिले जात आहे. इतकेच नाही तर बोगस मुखत्यारपत्रामध्ये वापरण्यात आलेला स्टॅम्पपेपरही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नाही तर मृदुला थोरात यांना या जागेच्या व्यवहाराबाबत पैसे दिल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी रुपी बँकेचे बँक स्टेटमेंट तयार करुन सादर केले होते. याबाबत रुपी बँकेत चौकशी केली असता जून २००० साली रुपी बँकेची हडपसर शाखा नव्हती. श्रेयस मनुभाई दोशी याच्या नावाने रुपी बँकेच्या कोणत्याही शाखेत बँक खाते नव्हते. बँक स्टेटमेंट पूर्णपणे बोगस व बनावट व तयार केलेले असल्याचे बँकेने कळविले.  सहायक पोलीस निरीक्षक एस एन डाबेराव तपास करीत आहेत.

You may have missed