Pune Crime News | ज्वेलर्सला भररस्त्यात अडवून जीवे मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न; सुखसागर नगरमधील रात्रीची घटना
पुणे : Pune Crime News | दुकान बंद करुन घरी जात असलेल्या ज्वेलर्सला दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
भरतसिंह मानसिंग जोधा राठोड (वय ४३, रा. सुखसागरनगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या ज्वेलर्सचे नाव आहे. त्यांचे भाऊ सोमसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४३) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा चोरट्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुखसागरनगरमधील महाराणी साडी दुकानाचे बाजुला २७ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतसिंह राठोड यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांचे अपर इंदिरानगर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. दुकान बंद करुन ते घरी जात होते. सुखसागरमधील महाराणी साडी दुकानाजवळ ते पोहचले असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांना हाताने मारहाण केली. लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यात, दोन्ही हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले. पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे तपास करीत आहेत.
