Pune Crime News | पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न; विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | पत्नीबरोबर जात असताना ‘‘ए बिगारी लोक कोई काम के नही,’’ असे बोलल्याने तरुणाने त्याला प्रतिउत्तर दिले. त्यावरुन झालेल्या वादावादीत दोघांनी तरुणाच्या पोटात, पाठीवर भोकसुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मनीष अशोक शाहु (वय १९) आणि मनीशंकर अशोक शाहु (वय २१, दोघे रा. प्रतिकनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत नंदकुमार जगेश्वर नेताम (वय ३७, रा. उत्तम टाऊन स्केप, प्रतिकनगर, येरवडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली. ही घटना प्रतिकनगरमधील उत्तम टाऊनस्केप बिल्डिंगमधील बेसमेंटमध्ये ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे तिघेही मुळचे छत्तीसगडमधील बमुरहड्डी येथील राहणारे आहेत. नेताम हे मागील एक वर्षापासून बिगारी म्हणून काम करतात. मनीष व मणीशंकर शाहु बांधकाम संबंधी काम करतात. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नेताम हे पत्नीसह बेसमेंट लेबर कॅम्प येथे चालत जात होते. तेथे मनीष व मणीशंकर शाहु थांबलेले होते. त्यांना पाहून मणीशंकर म्हणाला की, ए बिगारी लोक कोई काम के नही़ त्यावर नेताम यांनी त्यांना बघून हमको भी तुम बांधकाम करने वालों की कोई जरुरत नही है, असे बोलले.
त्याचा दोघांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ सुरु केली. त्यातून वाद वाढत गेला. मनीष हा धारदार शस्त्र घेऊन आला. त्याने नेताम यांच्या पोटावर, पाठीवर भोकसले. मणीशंकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांची पत्नी त्यांना सोडा म्हणून विनंती करत होती. परंतु, दोघांनी तिला ढकलून दिले. पोटातून, पाठीतून रक्त येत असल्याने त्यांनी आरडाओरडा करु लागले. तेव्हा त्यांचा साला सलम व प्रेम आले. त्यांनी नेताम यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर तपास करीत आहेत.
