Pune Crime News | मुलीमार्फत तरुणाला बोलावून अपहरण करुन पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्या तिघा सराईत चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीमार्फत कात्रज घाटात बोलावून तरुणाला पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्या तिघा चोरट्यांचा भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
अक्षय गंगाधर बुधेवार Akshay Gangadhar Budhewar (वय २२, रा़ गोकुळनगर, कात्रज), अमोल अंकुश शिंदे Amol Ankush Shinde (वय २८, रा. कर्वेनगर, कोथरुड) आणि राहुल तानाजी शितोळे Rahul Tanaji Shitole (वय २३, रा. लंबोदर अपार्टमेंट, महादेवनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळक्याने अशाच प्रकारे सासवड येथील एका तरुणाला लुटले होते. सासवड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा तशाच प्रकाराचा गुन्हा केला आहे. फक्त यामध्ये त्यांनी दुसर्या मुलीचा वापर केला आहे.
भूगाव येथील एका २८ वर्षाच्या तरुणाबरोबर या मुलीने इन्स्टाग्रामवर ओळख वाढविली. त्याला ७ डिसेंबर रोजी कात्रज चौकात भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला बाईकवरुन कात्रज घाटाकडे नेले. वाटेत एका ठिकाणी थांबविले. त्याचवेळी तिचे साथीदार आले. त्यांनी या तरुणाला मारहाण करुन येवलेवाडी येथे नेले. तेथे त्याला पुन्हा मारहाण करुन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी ७० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी १० हजार रुपये त्याच्याकडून घेतले. त्यानंतर त्याला उर्वरीत पैशांसाठी वारंवार फोन करत होते.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार हे आरोपींचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या बातमीवरुन त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नागेश पिसाळ, महेश बारवकर, मंगेश पवार, नवनाथ खताळ, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी केली आहे.
