Pune Crime News | भेटायला बोलावून पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्‍या टोळक्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी दाखल केला गुन्हा  

Pune Crime News | Bharati Vidyapeeth police have registered a case against a gang that demanded ransom by threatening to implicate them in a POCSO crime by inviting them to meet them.

पुणे : Pune Crime News |  इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणीने कात्रज घाटात भेटायला बोलावून साथीदारांच्या मदतीने धमकावले. पोक्सोचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत भुगाव येथील एका २८ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय शेलार, राहुल शितोळे, ऋषिकेश सुरते व एक तरुणी आणि इंस्टाग्राम अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज घाट, येवलेवाडी येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता घडला.

सोशल मीडियावर ओळख वाढवून मैत्री करुन फसवणुक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढू लागले आहेत. त्यात सायबर फसवणुकीबरोबरच लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढले आहे. तरुण, तरुणी अशा जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येते.

भुगाव येथील एका तरुणाशी राधिका नावाच्या तरुणीने इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यांचे चॅटिंग सुरु  झाले. काही दिवसात त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या तरुणीने फिर्यादीला कात्रज चौकात भेटायला बोलावले. ते भेटल्यानंतर तिने बाईक कात्रज घाटाकडे घेण्यास सांगितले. बाईकवरुन कात्रज घाटाकडे जात असताना एका ठिकाणी तिने त्याला थांबायला सांगितले. त्याने बाईक थांबविल्यावर तेथेच लपून बसलेले तिचे साथीदार तेथे आले. त्यांनी त्याला धमकावुन येवलेवाडी परिसरात नेले. त्याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी ७० हजारांची खंडणी मागितली. परंतु, त्याच्याकडे इतकी रक्कम नसल्याने शेवटी त्याच्याकडून १० हजार रुपये घेऊन त्याची सुटका केली. आपली बदनामी होऊ नये, म्हणून त्याने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्यानंतर उर्वरीत खंडणीची रक्कम देण्यासाठी गेले दोन दिवस त्याला ते सतत फोन करत होते. शेवटी त्याने  मंगळवारी रात्री भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करीत आहेत.

You may have missed