Pune Crime News | भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! मिरचीपूडचा दावा फोल? भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला कॉल; मेडिकल अहवालातून धक्कादायक खुलासा

crime

पुणे :  Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडलेल्या कथित अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला ही घटना सरळ अपहरणाची असल्याचे सांगितले जात होते. तरुणीच्या आई आणि भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोन्याची खरेदी करून परत येत असताना दोन तरुणांनी त्यांना अडवले, त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि 21 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने पळवून नेले. या आरोपांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि काही संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या मेडिकल अहवालाने या प्रकरणाला वेगळे वळण दिले. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकल्याचा दावा करण्यात आला होता; पण वैद्यकीय तपासणीत डोळ्यात तिखट किंवा मिरची गेल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. तरुणीने आपल्या भावाच्या मोबाईलवरूनच प्रियकराला फोन करून बोलावल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यानंतर दोघे विविध ठिकाणी फिरत होते. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली आणि तिने आपण स्वतःच्या इच्छेने गेल्याचे सांगितले. कोणतीही जबरदस्ती किंवा अपहरण झाले नसल्याचा तिचा दावा आहे.

सध्या पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सुरुवातीला अपहरण म्हणून गाजलेले हे प्रकरण आता प्रेमसंबंधातून घडले असल्याची शक्यता अधिक बळकट होताना दिसत आहे.

You may have missed